दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर अंगाचा थरकाप उडवणारं हत्याकांड मुंबई जवळच्या मिरारोड परिसरात घडलं आहे. मनोज साने नामक ५६ वर्षीय इसमानं आपल्या लिव्ह इन पार्टनरचे तुकडे करून फेकल्याचं समोर आलं आहे. मनोज साने हा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यानं आपल्या कृत्याची कबुली देताना त्यामागचं कारणही सांगितलं आहे.
मनोज साने हा सरस्वती वैद्य नामक महिलेसोबत मागील तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. शेजाऱ्यांना त्याच्या घरातून दुर्गंधी आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता हे थरकाप उडवणारं हत्याकांड उघडकीस आलं. त्यानंतर पोलिसांनी सानेला अटक केली आहे.
चौकशीत साने यानं आपल्या कृत्याची कबुली दिली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, साने आणि मृत सरस्वतीची भेट १६ वर्षांपूर्वी झाली होती. तेव्हा साने रेशन दुकानावर काम करत होता. ते दोघेही एकाच समाजाचे असल्यानं त्यांची मैत्री झाली आणि कालांतरानं ते रिलेशनशिपमध्ये राहू लागले.मनोज साने याला सरस्वतीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यातून दोघांची भांडणं होतं. या भांडणाला कंटाळून ४ जून रोजी तिनं विष घेतलं. त्यात तिचा मृत्यू झाला. तिच्या तोंडातून फेस येऊ लागला. त्यामुळं साने घाबरला. सरस्वतीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल आपल्यालाच दोषी धरलं जाईल अशी भीती त्याला वाटायला लागली. त्यानं हे सगळं लपवण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. आरोपीनंच पोलिसांना ही माहिती दिली आहे.सरस्वती अनाथ असल्यानंं कुणीही तिची चौकशी करणार नाही, असा सानेचा होरा होता. मात्र, तो चुकला. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज आणि सरस्वती कधीही आजूबाजूच्या लोकांशी संबंध ठेवत नसत. त्यांच्या दरवाजावर नेमप्लेटही नव्हती. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
लिव्ह-इन पार्टनर महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक केले, पण हत्या केली नाही?