तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या भारत राष्ट्र समिती पक्षाचा विस्तार मोठ्या आक्रमक पद्धतीने राबविण्याचे धोरण आखले आहे. त्यासाठी त्यांनी तेलंगणाच्या शेजारील महाराष्ट्राची निवड केल्याचे दिसून येत असून त्यांना राज्यातून प्रतिसादही मिळत असल्याचे चित्र आहे. राज्यातील विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील तब्बल ८ ते १० माजी आमदार केसीआर यांना परवा (बुधवारी) भेटून आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
तेलंगणात शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा प्रचार मोठ्या प्रमाणात भारत राष्ट्र समितीकडून करण्यात येत आहे. त्याबाबतची उत्सुकता राज्यातील नेते आणि सीमा भागातील जनतेमध्ये असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच भारत राष्ट्र समितीच्या (BRS) संपर्कात काही नेतेमंडळी जात आहेत. भेटीला येणाऱ्या प्रत्येकाशी केसीआर स्वतः बोलणी करत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरमधील नेते भगीरथ भालके हे विशेष विमानाने राव यांच्या भेटीसाठी गेल्याने त्याची मोठी चर्चा माध्यमांत झाली. मात्र, ‘बायरोड’नेही बरेच नेते केसीआर यांच्या भेटीसाठी गेले होते. त्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. त्या नेत्यांमध्ये तब्बल आठ ते दहा हे माजी आमदार होते. ते कुठल्या पक्षाचे होते, याबाबतची तपशील मिळू शकला नाही. यातील बहुतांश आमदार मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र (खानदेश) या भागातील असल्याची माहिती आहे.
भालके यांच्याप्रमाणे या माजी आमदारांनीही तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती आहे. भेटीत केसीआर यांनी त्यांना तेलंगण सरकार शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हे माजी आमदार बीआरएसमध्ये कधी प्रवेश करणार, याची उत्सुकता आहे. केसीआर यांच्या पक्षाबाबत महाराष्ट्रातील सीमा भागात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. त्यामुळे या प्रवेशाच्या कार्यक्रमाचा धडका के चंद्रशेखर राव कधी लावणार, असा प्रश्न आहे.
…तर बडा मासा गळाला लागणार
सोलापुरातील एक माजी आमदाराला गळाला लावण्याचे काम भारत राष्ट्र समितीच्या नेत्याकडून सुरू आहेत. संबंधित आमदाराकडून कसा प्रतिसाद मिळतो, यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत. ते जर राव यांच्या पक्षात गेले तर एक बडा मासा बीआरएसच्या गळाला लागू शकतो.
शंकरअण्णा धोंडगे यांची भूमिका महत्वाची
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय सहकारी राहिलेले शंकरअण्णा धोंडगे यांची भूमिका भारत राष्ट्र समितीसाठी महत्वाची ठरत आहे. राष्ट्रवादी किसान आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पवारांनी शंकरअण्णा यांच्यावर सोपवली होती. त्यामुळे राष्ट्रवादीतील नाराज कोण आहे, कोणाला पक्षाकडून संधी मिळालेली नाही, अशा लोकांवर शंकरअण्णांची नजर असणार आहे.
आता हा कोणता जिहाद ! प्रेयसीचे तुकडे का केले?; नराधम मनोज सानेचा पोलीस चौकशीत धक्कादायक खुलासा