हिमाचल आणि कर्नाटक राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी चार राज्यात होणाऱ्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यासाठी त्यांनी निवडणूक अभियान सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशात येत्या १२ जून रोजी त्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर आता काँग्रेस पार्टी आगामी निवडणुकासाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकातील विजयानंतर प्रियंका गांधी यांनी अन्य राज्यातील निवडणूका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.
मध्यप्रदेश आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीवर प्रामुख्याने प्रियंका गांधी यांचा फोकस राहणार आहेत. प्रियंका गांधी यांची यापूर्वी तेलंगणा येथे निवडणुकीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.येत्या १२ जून रोजी प्रियंका गांधी या मध्यप्रदेशात एका रॅलीत सहभागी होणार आहेत. या रॅलीत कर्नाटक निवडणुकीत दिलेले आश्वासन, महिलांसाठी विमा योजना आदींची घोषणा त्या करणार असल्याचे समजते. त्यानंतर त्या छत्तीसगढ येथील प्रचारात उतरणार आहे.
UP निवडणुकीत महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या महिला संवाद (महिला मंच) कर्नाटक निवडणुकीतही होता. हा महिला मंच MP राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा विधानसभा निवडणुकीतचा अविभाज्य घटक असेल. याशिवाय महिलांसाठी आर्थिक मदत, मोफत सिलेंडर, मोफत प्रवास आदींचा समावेश काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यात करणार असल्याची माहिती आहे.कर्नाटक विधानसभा निवडणुकीत CONGRESS पाच आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर त्यांची अंमलबजावणी काँग्रेस करीत आहे. आगामी निवडणुकीतही अशाच प्रकारचे आश्वासन काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यात देणार आहे.