संजय शिरसाट यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत महिला आयोगाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली होती. यासह अंधारे यांनी शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.
पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात शिरसाटांविरोधात तीन रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. या प्रकरणी आमदार संजय शिरसाट यांना न्यायालयाने समन्स बजावले आहे. त्यात त्यांना १३ जुलै रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यक्रमात शिंदे गटातील आमदार SANJAY SIRSAT यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी शिरसाटांविरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली होती. तसेच शिरसाट यांच्याविरूद्ध अंधारे यांनी तीन रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या दावाही दाखल केला आहे. या दिवाणी दाव्यात त्यांनी तीन रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, असे नमूद केले आहे.या प्रकरणी शिरसाट यांच्या विरोधात दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांनी समन्स बजावले आहे. त्यात शिरसाट यांना 13 जुलै रोजी सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर राहून दाव्याला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणी संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ‘क्लिनचिट’ दिली आहे.
आमदार शिरसाट यांनी यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधारे यांनी पुणे पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर शिरसट यांनी केलेल्या कथित विधानाबाबत अंधारे यांनी त्यांना मानहानीबाबत नोटीस बजावली होती. त्यामध्ये त्यांनी सात दिवसांत खुलासा करण्याची मागणी केली होती. मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अंधारे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरुपाचा दावा दाखल केला.
काय म्हणाले होते शिरसाट ?
काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारेंवर टीका करताना संजय शिरसाट यांनी आक्षपार्ह्य वक्तव्य केले होते. शिरसाट म्हणाले होते की, “ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तारभाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरेभाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण तिने काय-काय लफडी केली, हे तिलाच माहीत.” या वक्तव्य विरोधात सुषमा अंधारे यांनी दावा ठोकला आहे.