मला विरोधी पक्षनेतेपदामध्ये कोणताही रस नाही. मला संघटनेतील कोणतेही पद द्या, अशी मागणी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत कोणते नेते किती दिवस प्रदेशाध्यक्ष पदावर होते, याचे दिवसही मोजले होते. त्यामुळे अजित पवार यांचा रोख प्रदेशाध्यक्षपदाकडे आहे का? अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सर्व नेते मिळून निर्णय घेऊ
आज पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, पक्षात कोणती जबाबदारी कोणाला द्यावी याचा निर्णय मी एकटा घेत नाही. पक्षातील सर्व नेते मिळून अजित पवारांच्या मागणीवर निर्णय घेऊ, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, पक्षसंघटनेच्या कामात लक्ष घालावे, अशी सर्वांची भावना असते. तीच भावना शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी कोणतेही वेगळे मत व्यक्त केलेले नाही.
पंढरपुरात राष्ट्रवादीला धक्का
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगिरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला पंढरपूरमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. याचवेळी भगिरथ भालके हे भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार आहेत. यावर शरद पवार म्हणाले, वेगळे राजकीय चित्र दाखवण्याचा केसीआर यांचा प्रयत्न आहे. बीआरएसला राज्यात प्रतिसाद मिळेल की नाही हे भविष्यात कळेल.
कांदा दराचे बीआरएसकडून राजकारण
शरद पवार म्हणाले, केसीआर यांनी कांदा उत्पादकाचा प्रश्न उचलला आहे. हैदराबादमध्ये कांद्याला चांगला भाव देत असल्याचे ते म्हणत आहेत. सध्या मराठवाडा, कोकणात कांदा नाही. नाशिक आणि काही भागात केवळ कांदा आहे. हैदराबाद येथे कांद्याला चांगला भाव देत असल्याचे केसीआर सांगत आहेत. मात्र, महाराष्ट्रातून हैदराबाद येथे कांदा घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. कांद्याच्या दराचे केसीआर यांच्याकडून राजकारण सुरू आहे, अशी टीकाही शरद पवारांनी केली.