• Wed. Apr 30th, 2025

सामाजिक कार्यात तत्पर असणारी ‘दिशा’ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचली – गोयल

Byjantaadmin

Jun 26, 2023

लातूरच्या ‘दिशा’ प्रतिष्ठान तर्फे १ हजार गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सामाजिक कार्यात तत्पर असणारी ‘दिशा’ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचली – गोयल
 
 लातूर : ‘दिशा’ प्रतिष्ठान कायम सामाजिक कार्यात तत्पर असल्यामुळेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ‘दिशा’ पोहचली असल्याचे गौरवोद्गार लातूर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी काढले. ते लातूरच्या दिशा प्रतिष्ठान तर्फे आयोजित ‘दिशा दप्तर’ योजनेअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

लातूर शहरातील विष्णूदास मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे हे होते. तर डॉ. अशोक पोद्दार, लातूर मल्टी स्टेट बँकचे प्रमुख जब्बार सगरे, डॉ चेतन सारडा, डॉ अरविंद भातांब्रे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

गेल्या काही वर्षांपासून आरोग्य आणि शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात ‘दिशा’ प्रतिष्ठानने  भरीव कार्य करीत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक क्षेत्रात अडथळे येत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक, शैक्षणिक मदतीचे मोठं काम सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेले अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘दिशा’ प्रतिष्ठान करीत आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या पालकांना आपल्या मुलांच्या शैक्षणिक गरजा भागविताना विशेषतः ग्रामीण भागातील आर्थिक ताण सहन करावा लागतो. त्यामुळे ‘दिशा’ प्रतिष्ठानने ‘दिशा दप्तर’ ही योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी हा उदात्त हेतू ठेवून विद्यार्थ्यांना ‘दप्तर’ तसेच त्यासोबत वह्या, पेन, पुस्तक, कंपास, शूज, सॉक्स या शैक्षणिक साहित्याचे ‘किट’ या ‘दप्तर’ योजनेतून मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

पुढे बोलताना जि.प. सीईओ गोयल म्हणाले की, शासनाने मोफत शिक्षणाचा अधिकार दिला आहे. या माध्यमातून समाजातील इतर घटकांना मोफत शिक्षण देता येते. याची खरी अंमलबजावणी एक सामाजिक संस्था म्हणून ‘दिशा’ प्रतिष्ठानने विद्यार्थ्यांना मदत करून अधोरेखित केल्याचे म्हणाले. ‘दिशा’च्या माध्यमातून ज्या-ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत शैक्षणिक मदत झाली आहे. त्यांनी यशस्वी झाल्यावर ‘दिशा’ प्रमाणेच इतर गरजुंना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहनही यावेळी गोयल यांनी केलं. तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सोमय मुंडे म्हणाले की, आर्थिक परिस्थितीमुळे अनेक पालक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करू शकत नाहीत. पण ‘दिशा’ ने यासाठी पुढाकार घेतल्यामुळेच हे कार्य अभिनंदनास पात्र आहे. सध्या मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरु आहे. त्यामुळे पालक-शिक्षकांनी देशाची भावी पिढी असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यापासून दूर ठेवण्याचे आवाहन केलं.

दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले यांनी आपल्या मनोगतात ‘दिशा’ ने समाजासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांच्या माहिती दिली. प्रास्ताविक ओमप्रकाश झुरुळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन बालाजी सुळ यांनी केले तर आभार इसरार सगरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिशा चे सचिव जब्बार पठाण, संचालक विष्णुदास धायगुडे, प्रकल्प समन्वयक वैशाली यादव, स्वप्नील कोरे, शुभम आवाड, प्रणिता केदारे, परमेश्वर पाटील यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *