• Wed. Apr 30th, 2025

केसीआर यांची नियत चांगली नाही, एमआयएम प्रमाणे बीआरएस देखील भाजपची बी टीम – संजय राऊतांची टीका

Byjantaadmin

Jun 26, 2023

ज्याप्रमाणे महाराष्ट्रात एमआयएमने प्रवेश करून मतांचे विभाजन केले. अगदी त्याचप्रमाणे बीआरएस यांच्या पक्षाचे काम राज्यात असणार आहे. कारण तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची नियत चांगली नाही. ते भाजपची बी टीम म्हणून काम करत आहे, असा घणाघात ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला. तर भाजप-मिंधेगटाला महाविकास आघाडीच्या ताकदीची माहिती असून त्यामुळे त्यांची दाणादाण कशी होईल, याचा अनुभव त्यांना आलेला आहे, असे सूचक व्यक्तव्य करत राऊतांनी निशाणा साधला.

आत्ताच कशी विठुरायाची आठवण
विठ्ठलभक्ती देशभरात जगभरात आहे. त्यासाठी भाविक सगळीकडून येतात. पण तेलगंणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा बीआरएस पक्ष केवळ महाराष्ट्रात कसा येत आहे. त्यांना अचानक विठ्ठल भक्तीची कशी आस लागली आहे. त्यांना हा पंढरपुरवारीत कोणते शक्तीप्रदर्शन करायचे आहे.

राष्ट्रीय पक्ष केला अन् कुठे घुसताहेत तर महाराष्ट्रात. हजारो कोटींची बॅनर, प्रसिद्धी केली जात आहे. एवढा पैसा महाराष्ट्रात कसा येत आहे. त्याची चौकशी का होत नाही. हा पैसा हवालामार्गे तर येत नाही ना. कारण यातून अगदी स्पष्ट झाले आहे. केसीआर यांची नियत काही चांगली दिसत नाही. त्यांनी ठरवले पाहिजे आपण कोणाला मदत करत आहोत. एकीकडे केंद्रसरकारला ते हुकुमशाही म्हणतात. मग हुकूमशाहीला मदत करायची की त्यांच्या विरोधात लढाई करायची याचा विचार देखील त्यांनी केला पाहिजे. केवळ मतफुटीचे राजकारण करून काहीही साध्य होणार नाही.

भाजप-मिंधेगटाची दाणादाण
नवीन एमआयएम म्हणजे बीआरएस पक्ष आहे. असे मत संजय राऊतांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी एकत्र लढणारे आहे. आमची एकी पक्की आहे. त्यामुळे भाजप-मिंधेगटाची दाणादाण उडेल. भाजपने सोडलेले मोहरे यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडी आपल्या पद्धतीने काम करत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *