मुंबईसह राज्यभरात रविवारपासून पावसाने हजेरी लावली आहे. सध्या मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात यंदा पावसाला उशीरा सुरुवात झाली असली तरी दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्याच पावसाने मुंबईचा खोळंबा झाल्याचे पाहयला मिळत आहे.
- पुणे जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत (30 जून) शहर आणि घाटमाथ्यावर पाऊस रोज हजेरी लावण्याची शक्यता.
- छत्रपती संभाजीनगर शहरात हलक्या सरी कोसळल्या.
- मुंबईसह पालघर, ठाणे या जिल्ह्यांसाठी मंगळवारी आणि बुधवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
- रायगडसाठी पुढील चारही दिवस, तर रत्नागिरीसाठी मंगळवारपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
- सिंधुदुर्गात मंगळवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
- मध्य महाराष्ट्रातही पुढील 48 तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
- मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूरसह कोकणात जोरदार पाऊस पडत आहे.
मुंबईतील नाले तुंबले
पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी भरले असून नाले ओसंडून वाहत आहे. त्यामुळे शंभर टक्के नालेसफाईचा दावा करणाऱ्या प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची तुंबई झाल्याने वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत. अशातच मध्य रेल्वेवर मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने रेल्वे वाहतूकही खोळंबली आहे. त्यामुळे नोकरदार रेल्वे स्थानकावरच अडकून पडले आहेत. दरम्यान, रविवारी पाऊस पडल्यानंतर अवघ्या 24 तासांत 1200 तक्रारींचा ऑनलाईन पाऊस पालिकेपुढे पडला आहे. पहिल्याच पावसात मुंबईची ही अवस्था असेल तर पुढे संपूर्ण पावसाळाभर मुंबईची काय दशा होणार, असा सवाल मुंबईकर विचारत आहेत.
जलसंकट दूर होण्याची आशा
दरम्यान, मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून गुरुवारपर्यंत म्हणजे 29 जूनपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे खरीपाच्या कामांना वेग आला आहे. केरळमध्ये 8 दिवस उशीरा दाखल झाल्यानतंर मान्सूनने रविवारी देशभरात सर्वात मोठी सलामी दिली. रविवारी प्रत्येक राज्यात पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे रविवारी मुंबईतील चौपटी पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आली. पुणे शहरात रविवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाअभावी कोयना धरणाची पाणीपातळी चांगलीच खालावली आहे. तथापि, पावसाने असाच जोर कायम ठेवल्यास जलसंकट दूर होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात ढगाळ वातावरण
मराठवाड्यातील उदगीर , देवणी , गंगापूर, शिरूर, निलंगा, रेणापूर, कळंब, चाकूर येथे हलक्या ते मध्यम स्वरुपात पाऊस पडत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळत आहेत. तथापी आगामी तीन ते चार दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.