अमरावती : काही प्रसार माध्यमे मुस्लीम द्वेष पसरविण्याचे काम करीत असून देशात दोनच ‘एम’ खोटे बोलतात, एक मीडिया आणि दुसरे मोदी आहेत, अशी टीका ‘एमआयएम’चे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी रात्री येथे केली.
मुझफ्फरपुरा परिसरात आयोजित जाहीर सभेत ओवेसी म्हणाले, सर्व धर्मनिरपेक्षा पक्ष एकत्र येऊन भाजपचा २०२४ मध्ये पराभव करू शकतात, पण पाटणा येथे झालेल्या सभेला ‘एमआयएम’ सह बसपाला देखील बोलविण्यात आले नव्हते, ही बाब अनाकलनीय आहे. या सभेला खासदार इम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार काझी, विदर्भ अध्यक्ष शाहीद रंगूनवाला, प्रदेश सरचिटणीस अब्दूल नाझिम आदी उपस्थित होते.ओवेसी म्हणाले, मलकापूरच्या सभेत कुठल्याही बादशहाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या नाहीत, तरीही काही माध्यमांनी खोट्या बातम्या दिल्या. या वृत्तीचा निषेध केला पाहिजे. ही माध्यमे केवळ ‘टीआरपी’ साठी जाती-धर्माच्या नावावर द्वेष पसरवण्याचे काम करीत आहेत. ज्या प्रसारमाध्यमांकडून प्रामाणिकपणे काम होत नसेल, त्यांनी बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे काम करावे, असा सल्ला ओवेसी यांनी दिला.अमरावतीच्या खासदार बाईला मुस्लीम समाजाने भाजपला पराभूत करण्याच्या उद्देशाने मते दिली, पण दिल्लीत पोहचल्याबरोबर या बाईंनी आपला खरा रंग दाखवून दिला, अशी टीकाही ओवेसी यांनी खासदार NAVNEET RANA यांचे नाव न घेता केली. खासदारांनी मुस्लीम समाजासोबत २०१९ मध्ये राजकारण केले. आता समाजाने निवडणूक लढवावी, असे आवाहन त्यांनी केले.पंतप्रधान MODI यांना जगभरातील सहा मुस्लीम राष्ट्रांकडून पुरस्कार मिळाल्याचे देशाच्या अर्थमंत्री सांगतात, पण या देशातील मुसलमानांना या राष्ट्रांशी काहीही घेणे-देणे नाही. इथला मुसलमान हा भारतीय आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानणारा आहे, असे ओवेसी यांनी सांगितले.