• Sun. May 4th, 2025

तब्बल ६०० गाड्यांचा ताफा आणि अख्ख्या मंत्रिमंडळासह केसीआर हैदराबादहून पंढरपूरकडे रवाना

Byjantaadmin

Jun 26, 2023

सोलापूर: भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे अध्यक्ष, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे आपल्या अख्ख्या मंत्रिमंडळासह आषाढी वारीचे औचित्य साधून पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी हैदराबादहून सोलापूरकडे निघाले आहेत. त्यांच्याबरोबर पक्षाचे आमदार-खासदार व प्रमुख नेत्यांसह सुमारे सहाशे मोटारींचा ताफा आहे.तथापि, केसीआर आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाला पंढरपुरात विठ्ठलाच्या व्हीआयपी दर्शनासाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी हिंदूराष्ट्र सेनेच्या सोलापूर शाखेने केली आहे. चंद्रशेखर राव हे आपल्या मंत्रिमंडळ आणि सहकारी आमदार-खासदारांसह दुपारी हैदराबादच्या प्रगती भवनातून सोलापूरकडे निघाले असताना इकडे सोलापुरात त्यांच्या रात्रीच्या मुक्कामासाठी विविध हॉटेलांमध्ये २२५ खोल्यांची सोय करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या स्वागतासाठी शहरात तेलुगू भाषकांच्या प्रभावाखालील पूर्व भागात अनेक ठिकाणी भारत राष्ट्र समिती पक्षाचे ध्वज उभारण्यात आले आहेत.

KCR with cabinet

सोलापुरात रात्रीच्या मुक्कामानंतर उद्या मंगळवारी सकाळी केसीआर व त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासह आमदार-खासदार पंढरपूरला रवाना होतील आणि विठ्ठल मंदिरात पूजा आणि दर्शन करतील. पंढरपूरहून परत येताना तुळजापूर येथे थांबून तुळजाभवानी मंदिरातही केसीआर हे ताफ्यासह दर्शन घेणार आहेत. तत्पूर्वी, पंढरपुरात सरकोली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांच्या गावात सरकोली येथे केसीआर व त्यांचे सहकारी शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. याचवेळी भगीरथ भालके हे आपल्या सहकाऱ्यांसह बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.केसीआर यांचा संपूर्ण मंत्रिमंडळ व आमदार-खासदारांसह आषाढी वारीचे औचित्य साधून PANDHARPUR (आणि तुळजापूर) दौरा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला असताना त्यांना विठ्ठलाचे व्हीआयपी दर्शन देऊ नये, अशी मागणी हिंदूराष्ट्र सेनेने केली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन यासंदर्भात निवेदन दिले आहे. एकीकडे आषाढी वारीसाठी ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत शेकडो मैलांवरून पायी चालत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना पंढरपुरात विठ्ठल दर्शनाची ओढ लागली असताना केसीआर व त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने केवळ राजकीय शक्तिप्रदर्शन घडविण्याच्या हेतूने पंढरपूर दौरा आखला आहे. त्यांना विठ्ठलाचे व्हीआयपी दर्शन देणे हा लाखो वारकऱ्यांवर अन्याय ठरणार आहे, असे हिंदूराष्ट्र सेनेचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *