• Sun. May 4th, 2025

दर्शनाची हत्या केल्यानंतर लपण्यासाठी काय-काय केलं, राहुलचा प्लान ऐकून पोलिसही चक्रावले

Byjantaadmin

Jun 26, 2023

पुणे: पुण्यातील एमपीएससी टॉपर दर्शना पवारच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला आहे. दर्शनाच्या हत्येने फक्त पुणेच नाही तर राज्यात एकच खळबळ माजली. MPSC परीक्षेत अव्वल कामगिरी करणाऱ्या दर्शना पवारचा मृतदेह १८ जूनला राजगडाच्या पायथ्याशी आढळून आला आणि सगळेच हादरले. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने कामगिरी करत दर्शनाचा मारेकरी असलेल्या राहुल हंडोरेला मुंबईतून अटक केली. त्याने दर्शनाची हत्या केल्याची कबुलीही दिली आहे. दर्शनाचा खून केल्यानंतर राहुलचा नेमका प्लान काय होता, याची माहिती त्याने पोलिसांनी दिली. त्याचा जबाब एकून पोलिसांनाही आश्चर्य वाटलं.

पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न

दर्शनाची हत्या केल्यानंतर राहुल फरार झाला होता. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने पुण्यातून पळ काढला, तो वेगवेगळ्या शहरात फिरत राहिला. यादरम्यान त्याने रेल्वेने प्रवास केला. पुण्यातून तो सर्वात आधी सांगलीत गेली. त्यानंतर तेथून त्याने गोवा गाठलं. त्यानंतर तो थेट चंदीगडला पोहोचला. त्यानंतर तो पश्चिम बंगालमधील हावडा येथे गेला.
यावेळी राहुलने पोलिसांपासून कसं लपायचं याची सारी तयारी केली होती. त्याने त्याचा मोबाईल पूर्णवेळ बंद ठेवला होता, जेणेकरुन पोलिसांना त्याच्या लोकेशनची माहिती मिळू नये. जेव्हा गरज असेल तेव्हा तो नातेवाईक-मित्रांना फोन करायचा. पण, यावेळी त्याने खबरदारी घेतली. त्याने आपल्या फोनवरुन एकही फोन केला नाही. तर, प्रवासात सहप्रवाशांकडून फोन घेऊन त्याने संपर्क साधला. यादरम्यान, त्याने पाच वेगवेगळ्या ठिकाणांहून फोन केले.पोलिसांना आपली कुठल्याही प्रकारची माहिती मिळून नये, याची तो पूर्ण खबरदारी घेत होता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणाने एखाद्या कुख्यात गुन्हेगाराप्रमाणे खून करुन पोलिसांना गुंगारा देण्याचा कट रचावा हे कोणालाच न पचणारं आहे, त्यामुळे त्याचा जबाब ऐकून पोलिसही चक्रावून गेले होते.

दर्शनाचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ या घटनेचा तपास सुरु केला होता. यावेळी पोलिसांनी तपासात अत्यंत गुप्तता बाळगली होती. पोलिसांनी तपासाची माहिती बाहेर फुटू दिली नाही. एकीकडे पोलिस राहुलचं लोकेशन ट्रेस करत होते, तर दुसरीकडे त्याच्या नातेवाईकांचीही चौकशी सुरु होती. तेव्हा कुटुंबीयांनी पोलिसांना राहुलच्या प्रवासाची माहिती दिली आणि पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली. पोलिसांना कसा गुंगारा देता येईल आणि त्यांचं लक्ष या प्रकरणावरुन विचलित करण्याचा त्याचा प्लान होता. इतकंच नाही, तर हे प्रकरण समोर आल्यानंतर प्रवासात आपली ओळख पटू नये याचीही काळजी त्याने घेतली. तर, पोलिसांना आपलं लोकेशन सापडू नये, यासाठीही त्याने सारी प्लानिंग केली

सहप्रवाशांच्या फोनवरुन नातेवाईकांना फोन

तो प्रवासात सहप्रवाशांच्या फोनवरुन तो कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना फोन करायचा. संपर्क झाल्यानंतर तो लगेच आपलं ठिकाण बदलायचा. जेणेकरुन पोलिसांना मिसलीड करता येईल आणि पोलिसांना त्याचं खरं लोकेशन कळणार नाही. एखाद्या शातिर गुन्हेगाराप्रमाणे त्याने हे सारं काही घडवून आणलं. सतत लोकेशन बदलत असल्याने तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पण, पोलिसही आपली सारी ताकद लावून त्याला शोधत होते, त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. यातच पोलिसांच्या हाती एक टिप लागली आणि राहुलचा सारा खेळ संपला.राहुल हा मुंबईतील अंधेरी स्थानकावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन त्यांनी सापळा रचला आणि राहुलला अटक केली. राहुल हा अंधेरीवरुन पुण्याच्या दिशेने येणार होता. मात्र, तो पुन्हा एकदा निसटून जायच्या आधी पोलिसांनी त्याला पकडलं.

लग्नाला नकार दिल्याने दर्शनाला संपवलं

राहुल हंडोरेला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयाने २९ जूनपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या चौकशीत राहुलने आपला गुन्हा कबुल केला आहे. राहुलवर वेल्हे पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करुन अधिकारी झाल्यानंतर दर्शनाने राहुलपासून अंतर केलं. राहुलने तिच्याकडे लग्नासाठी विचारलं, तर तिने लग्नालाही नकार दिला. यामुळे राहुलने तिला ट्रेकिंगच्या बहाण्याने सोबत नेलं आणि तिची हत्या केल्याची माहिती आहे. सध्या पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *