आयटाची मागणी शासनाने केली मान्य!लवकरच नवीन शिक्षक भरती करिता पवित्र पोर्टल वर नोंदणी प्रक्रिया होणार सुरू
मुंबई : (प्रतिनिधी)शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा २०२३ चा निकाल लागून दोन महिने होऊन गेले परंतु शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही म्हणून एकीकडे उमेदवारांमध्ये नैराश्याची परिस्थिती निर्माण होत आहे. तर दुसरीकडे शिक्षकांची वाट पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे अपरिमित शैक्षणिक नुकसान होत आहे. सदरील बाब लक्षात घेता शिक्षकांची राष्ट्रीय नोंदणीकृत संघटना ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन ‘आयटा’ महाराष्ट्राने १२ जून २०२३ रोजी शासनास पत्र पाठवून इतर मागण्यांसह नवीन शिक्षक भरती करिता पवित्र पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया त्वरित सुरू करण्याची मागणी केली होती. जे महाराष्ट्र शासनाने मान्य करीत दिनांक २१ जून २०२३ रोजी शिक्षक भरती प्रक्रिया संदर्भात शासन निर्णय निर्गमित केलं आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सबंध महाराष्ट्रात एकूण ६५१११ जागा शिक्षकांच्या रिक्त आहेत.या रिक्त जागांपैकी ५० टक्के जागा भरण्याचे शासनाने घोषित करून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन केले. सदरील परीक्षेचा निकाल लागून दोन महिने होऊन गेले व नवीन शैक्षणिक वर्षही सुरू झाले परंतु अद्याप शिक्षक भरती संदर्भात पुढील प्रक्रिया सुरू न झाल्याने शिक्षकांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून व तसेच विभागीय स्तरावर भरती प्रक्रिया राबविण्यात येऊ नये व आंतरजिल्हा बदली बंद करू नये.( यामुळे महिला उमेदवारांना खूप त्रास होणार आहे) आणि नियुक्ती यादी सोबत प्रतिक्षा यादी सुद्धा लावण्यात यावी. अशा मागण्यांचे निवेदन आयटाने राज्य शासनास पाठवले होते.
२१ जून रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयान्वये नवीन शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. व तसेचआअंतरजिल्हा बदली जरी शासनाने बंद केली आहे तरी महिलांच्या बाबतीत (पती पत्नी एकत्रीकरण) त्यास अपवाद असेल. असे नमूद केले आहे.
शासनाने मान्य केलेल्या मागणीच्या संदर्भात आयटा महाराष्ट्राचे राज्य अध्यक्ष सय्यद शरीफ व इशू ऍड्रेसींग कमिटीचे कन्व्हीनर पठाण शरीफ खान यांनी शासनाचे आभार व्यक्त केले.