• Sat. Aug 16th, 2025

उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, आमदार, खासदारांनी फोन केले, तरीही शाळेने त्या १४ विद्यार्थ्यांना काढलं

Byjantaadmin

Jun 22, 2023

लातूर : शहरातील संत तुकाराम विद्यालयातील १४ विद्यार्थ्यांना कथित हाणामारी भोवली आहे. या विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे. पालकांच्या विनंतीवरून आमदार, खासदारांसह शिक्षणमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनीही मध्यस्थी केली. पण, शाळा प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम आहे.लातूर पॅटर्न त्यातल्या त्यात सीबीएससीचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणून संत तुकाराम विद्यालयाकडे पाहिले जाते. शिक्षण क्षेत्रात दबदबा निर्माण करणाऱ्या या विद्यालयात विद्यार्थ्यांना शिस्तप्रिय अन् विनम्रतेचेही धडे दिले जातात. असे असताना २५ एप्रिल रोजी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. मात्र हा वाद तिथेच मिटण्याऐवजी इतका विकोपाला गेला की या विद्यार्थ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली अन् विनयशिलतापूर्ण शिस्तप्रियतेची इभ्रत निघाली. ही बाब शाळा प्रशासनाच्या वर्मी लागली. त्यामुळे शाळा प्रशासनाने दोषी आढळून आलेल्या १४ विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय शाळा घेतला. आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना काढून टाकण्यात आले आहे.

Latur News

पालकांना ही बाब समजताच त्यांनी शाळेत धाव घेतली. सर्व प्रकार जाणून घेतला. परंतु आपला पाल्य हाणामारी आणि भांडण करणार नाही, असा त्यांना वाटू विश्वास होता. यामुळे त्यांनी शाळा प्रशासनाला आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली. पण शाळा प्रशासनाने स्पष्ट नकार दिला.आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या इयत्ता दहावीच्या शैक्षणिक वर्षात या शाळेने आपल्या पाल्याला काढून टाकले तर…? पाल्याचे होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीचा विचार करून पालक चिंताग्रस्त झाले. अखेर या पालकांनी जिल्हाधिकारी, जिल्ह्यातील दोन आमदार, शिक्षण मंत्री अन् थेट उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत धाव घेत मध्यस्थी करण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, दोन आमदार जिल्हाअधिकारी या सर्वांनी शाळा प्रशासनाची चर्चाही केली. मात्र, शाळा प्रशासनान अद्यापही आपल्या निर्णयावर ठाम आहे.

ठीक आहे, विद्यार्थ्यांनी हाणामारी केली असेलही. पण यात नेमके कोण दोषी आहेत, असा प्रश्न पालकांनी केला आहे. आम्हाला किमान ‘त्या’ घटनेचे सीसीटीव्ही फुटेज दाखविण्यात यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. आमचे पाल्य दोषी आढळून आले तर आम्ही शाळा सोडायला तयार आहोत अशी भूमिका पालकांनी घेतली आहे. मात्र त्यांना अद्याप सीसीटीव्ही फुटेज दाखविण्यात आलेले नाही.

या सर्व पार्शवभूमीवर शाळा प्रशासनान आपल्या निर्णयावर ठाम राहत ‘त्या ‘ कथीत हाणामारी प्रकरणातील दोषी १४ विद्यार्थ्यांना शाळे बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आता या प्रकरणावरून शिक्षण विभाग शाळेवर कारवाई करणार का? तसेच या १४ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचं काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *