• Sat. Aug 16th, 2025

स्कूलबस चालवतानाच ड्रायव्हरला हार्ट अटॅक, २५ विद्यार्थ्यांचे…

Byjantaadmin

Jun 22, 2023

लातूर : शाळेत घेऊन जाणाऱ्या बसचालक, रिक्षावाल्या काकांशी विद्यार्थ्यांचे चांगलेच आपुलकीचे नाते असते. विशेष म्हणजे आपली मुलं रिक्षा, बसचालकाच्या हवाली करताना पालकांमध्येही विश्वासाहर्ता असते. याच विश्वासाला लातूरमधील एका स्कूल बसचालकाने सार्थ ठरवले आहे. एसटी महामंडळात चालक म्हणूण निवृत्त झालेले भोपलकर हे स्कूलबसवर चालक म्हणूण रूजू झाले होते. त्यांना बस चालवताना हृदयविकाराचा झटका आल्यावरही लातूरमधील बसचालकाने प्रसंगावधान राखत २५ चिमुकल्यांचा जीव वाचवला आहे. खऱ्या आयुष्यातील रिअल हिरोचा प्रत्यय लहानग्यांना आला.याबद्दल अधिक माहिती अशी की, शहरातील रविशंकर या शाळेच्या बसचे चालक महावीर भोपलकर हे दुपारी शाळा सुटल्यानंतर बसमधील २५ विद्यार्थ्यांना घरी घेऊन जात होते. दरम्यान, भोपलकर यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. आपल्याला हृदयविकाराचा झटका आला आहे हे भोपलकर यांच्या लक्षात आले. प्रचंड त्रास होत असतानाही त्यांनी प्रसंगावधान राखून बस भर रस्त्यातून बाजूला घेत बंद केली. दरम्यान काका..काका काय झालंय म्हणत कोवळ्या मनाला वाटणारी भीती बाजूला सारत विद्यार्थ्यांनी आरडा ओरड करण्यास सुरुवात केली.

latur schoolbus
मुलांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेत भोपलकर यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी धावत जाऊन एका डॉक्टरला घेऊन आले. त्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल करून घेतले मात्र, तोपर्यंत भोपलकर यांची प्राणज्योत मालवली होती. स्वतःचा जीव जातोय हे लक्षात आल्यानंतरही भोपलकर यांनी २५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचविले. ही घटना कळताच शाळेचे शिक्षक, पालक विद्यार्थी गोळा झाले होते. या घटनेने लातुर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *