मोदींची सत्ता आल्यापासून देशात भोंदूगिरी, बुवाबाजी वगैरे गोष्टींना महत्त्व मिळालंय. देशाचे पंतप्रधान गटाराच्या नाल्यातून ‘गॅस’ निर्माण करण्याची भाषा करतात व अंधभक्त माना डोलावतात. भाजपनं देशात अंधभक्त नावाची एक नवी जमात निर्माण केलीय. विज्ञान, संशोधन, आधुनिकता वगैरेंशी त्यांचा काहीच संबंध नाही, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं केलीय.मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर हरयाणात महिलांची उंची वाढली आहे. माझ्या बहिणींची उंचीदेखील दोन-दोन इंचांनी वाढली आहे, असा दावा हरयाणा भाजपचे अध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांनी केलाय. कोविडवरील लस मोदींनी तयार केलीय असं अलीकडंच देवेंद्र फडणवीस बोलून गेले होते. ‘विज्ञानाची घसरण’ या शीर्षकाखाली भाजप नेत्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेणारा अग्रलेख शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’त प्रसिद्ध झाला आहे. अग्रलेखातून मोदी सरकार व भाजप नेत्यांवर सडकून टीका करण्यात आली आहे.’मोदी युगात बुवाबाजीस महत्त्व मिळाले. कारण विज्ञानशून्य हिंदुत्वावरच भाजपची चूल पेटते आहे. वर्षाला दोन कोटी नोकऱ्या निर्माण करण्याच्या घोषणा देणाऱ्या मोदी यांच्या कार्यकाळात बेरोजगारी, महागाई वाढली. स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, आरोग्य, शिक्षण महागले. पण महिलांची उंची वाढल्याचे तारे तोडले जात आहेत. महिलांची उंची वाढली असेल तर मग गगनाला भिडलेल्या महागाईची, बेरोजगारीची उंची कमी का होऊ शकत नाही? मणिपूरमधील हिंसाचाराच्या आगीवर शांततेचे पाणी ओतण्याची उंची मोदी सरकारनं का गाठली नाही? मोदी काळातील भ्रष्टाचाराची उंचीही दाहक आहे. लडाखमध्ये घुसलेल्या चीनच्या बाबतीतही राज्यकर्ते ठाम भूमिका घेताना दिसत नाहीत, याकडं अग्रलेखातून लक्ष वेधण्यात आलंय.
लोकशाहीच्या उंचीचं मोजमाप आवश्यक
मोदी युगात देशाच्या जनतेची प्रतिष्ठा, मानवी हक्क, संविधान, लोकशाहीची उंची किती वाढली याचे मोजमाप होणं गरजेचं आहे. मोदींच्या कार्यकाळात हिंदुत्व कमालीचं संकुचित व भयग्रस्त झाल्याचं दिसत आहे. देशातील सर्व प्रमुख संशोधन, वैज्ञानिक, तांत्रिक संस्थांचा ताबा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं घेतला असून मोक्याच्या जागी संघ विचारांची माणसे बसवली. जेव्हा विज्ञानाची जागा धर्मांधता घेते तेव्हा हेच घडतं व वेगळ्या प्रकारची फॅसिस्ट राजवट सुरू होते. मोदींमुळं मुलींची उंची वाढली हा विचार त्याच राजवटीतून निर्माण झाला. नेहरूंनी देशाला विज्ञान व संशोधनात उंच नेऊन ठेवले. त्या उंचीवरून देश खाली घसरताना दिसत आहे, अशी खंतही शेवटी व्यक्त करण्यात आलीय.