पुण्यासह राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या दर्शना पवार हत्याकांड प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. दर्शना हत्या प्रकरणातील संशयित आरोपी राहुल हांडोरे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळं आता या प्रकरणाचा पुढील काही तासांतच छडा लागण्याची शक्यता आहे. दर्शना पवार आणि राहुल हांडोरे हे राजगडावर फिरण्यासाठी गेले होते. परंतु गडावरून फक्त राहुल बाहेर पडला होता. काही दिवसांनंतर दर्शना पवारचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी आढळून आला होता. राहुल हांडोरे फरार झालेला असल्याने पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता पुणे पोलिसांच्या प्रयत्नांना अखेर मोठं यश आलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दर्शना पवार आणि राहुल हांडोरे एकमेकांचे नातेवाईक होते. दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत असल्याने राहुलची दर्शनासोबत लग्न करण्याची इच्छा होती. दोघेही पुण्यात स्पर्धा परिक्षांची तयारी करत होते. काही दिवसांपूर्वीच दर्शना पवार एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण झाली होती. दर्शनाला वन विभागाची सरकारी नोकरी मिळणार होती. दर्शनाला वनअधिकारी पद मिळणार होतं. परंतु दर्शनाच्या घरच्यांनी दुसऱ्याच तरुणासोबत दर्शनाच्या लग्नाची तयारी सुरू केली. त्यामुळं दर्शनाने राहुलशी ब्रेकअप केले होते. त्यावरूनच राहुल आणि दर्शना यांच्यात सातत्याने वाद होते. दर्शना लग्नाला नकार देत असल्याच्या कारणावरूनच राहुलने राजगडाच्या पायथ्याशी तिची हत्या केली. त्यानंतर दर्शनाचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी फेकून राहुल फरार झाला होता. त्यानंतर आता पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे.दर्शना पवार हत्याकांडाचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उप विभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राहुल गावडे आणि प्रदीप चौधरी यांनी वेगवेगळी पथकं तयार करून रवाना केलेली होती. गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात आल्याने पुणे पोलिसांच्या कारवाईचं कौतुक करण्यात येत आहे.
कोण आहे राहुल हांडोरे?
राहुल हांडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातल्या शाह गावाचा आहे. त्याने विज्ञान शाखेत पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तो पुण्यात स्पर्धा परिक्षांची तयारी करत होता. दर्शना आणि राहुल यांची ओळख पुण्यातच झाली होती. मागील काही महिन्यांपासून दर्शना आणि राहुल एकमेकांच्या संपर्कात होते. दोघे राजगडावर फिरायला गेल्यानंतर दर्शना अचानक बेपत्ता झाली. गडाच्या पायथ्याशी दर्शनाचा मृतदेह आढळून आल्यापासून राहुल हांडोरे फरार झालेला होता.