‘महाराष्ट्रात आतापर्यंत विभागीय किंवा जिल्हा स्तरावरच शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांना मंजुरी राज्यशासनाने दिली आहे. मी उच्च तंत्रशिक्षण मंत्री व या खात्याचे उपसचिव कांतीलाल उमाप होते. त्यावेळी त्यांनी अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील ग्रामपंचायत स्तरावरील प्रस्ताव तयार केला होता.मी म्हणालो, ‘हे कसे शक्य होईल,’ त्यावेळी उमाप यांचा आग्रह कायम होता. मंत्री मंडळ बैठकीसाठी प्रस्ताव घेऊन गेलो. मात्र, त्यावेळी आम्ही चिंतेत होतो. मंत्रीमंडळाच्या बैठकीत विषय आल्याबरोबर लगेचच मुख्यमंत्री (स्व.) विलासराव देशमुख यांनी ‘दिलीपराव तुमचे महाविद्यालय मंजूर’ असे हसतच जाहीर केले.
तो माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण होता. कारण अभियांत्रिकी महाविद्यालयामुळे हजारो गरीब कुटुंबातील मुलांचे अभियंता होण्याचे स्वप्न साकार झाले. त्यांना हक्काचा रोजगार मिळाला. विलासराव देशमुख हे दिलदार मुख्यमंत्री होते.” अशा शब्दात माजी गृहमंत्री DILIP WALSE PATIL यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मंचर (ता आंबेगाव) येथील शिवगिरी कार्यालयात रविवारी (ता १८) NCP पक्ष व राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र यांच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वी तील गुणवंत विद्यार्थी व अधिकारी पदी निवड झालेल्यांचा सन्मान प्रसंगी वळसे पाटील बोलत होते. ते म्हणाले की, माझे इयत्ता ११ वी पर्यंतचे शिक्षण निरगुडसर येथे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात झाले. त्यानंतर मुंबईत कायद्याची एल. एल. एम. व पत्रकारितेची पदवी संपादन केली.
जेष्ठ नेते शरद पवार साहेब यांचा सहवास लाभला. प्रशासनाबरोबर काम करण्याचा अनुभव मिळाला. राजकारणात आलो. आंबेगाव तालुक्यात त्यावेळी प्रतिकूल राजकीय परिस्थिती होती. १९९० पासून आज तागायत सात वेळा वाढत्या मताधीक्याने येथील जनतेने निवडून दिले आहे. मी इंजिनियर, डॉक्टर किंवा अर्थतज्ञ नसतानाही उच्च तंत्रशिक्षण, उर्जा, वैदकीय व अर्थमंत्री या पदावर काम केले.
भारनियमन कमी करण्यात यश आले. वीज उपकेंद्राचे जाळे उभे करून कृषीपंपाना मोठ्याप्रमाणात वीजपुरवठा उपलब्ध करून दिला. जवळपास सर्व खात्यात अनेक नाविन्यपूर्ण योजनांना अर्थसाह्य मिळवून दिले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व, व्यक्तिमहत्व, विकास संभाषण, कौशल्य हे गुण आत्मसात केले पाहिजेत. त्यासाठी पालकांनी मुलांना याबाबत प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले पाहिजे. शेतकरी कुटुंबातील सनदी अधिकारी कांतीलाल उमाप यांच्यासह पाच भावंडांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कॅरियर करून मिळवलेले यश तरुण पिढीला दिशा दर्शक आहे.
यावेळी सनदी अधिकारी कांतीलाल उमाप, विष्णू हिंगे, बाळासाहेब बेंडे, विवेक वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील , पूर्वा वळसे पाटील, सुभाषराव मोरमारे, शिवाजीराव ढोबळे, रमेश खिलारी, सचिन पानसरे, प्रा. अनंत गोसावी, मानसी साकोरे, अनिदिता वालिया मुख्याध्यापक सुनील वळसे पाटील उपस्थित होते.
.