सोलापूर : श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी बेकायदेशीर ठरवून पाडून हजारो सभासद शेतकरी आणि कामगारांच्या रोजीरोटी हिरावून घेतली आहे. एवढी क्रूरता कधीही दिसून आली नव्हती. राज्यातील भाजपचे सरकार मायबाप सरकार नसून तर हैवान सरकार आहे, अशा कठोर शब्दांत प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले विमानसेवेसाठी हसिध्देश्वर साखर कारखान्याच्या ३८ मेगावाट क्षमतेची सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी अडथळा ठरते आणि बेकायदेशीर म्हणून पाडण्यात आली आहे. या कठोर कारवाईमुळे सहवीज निर्मिती कायमची बंद पडणार आहे. शिवाय दहा हजार मे. टन गाळप क्षमतेच्या सिध्देश्वर साखर कारखान्याचे आगामी सलग दोन गळीत हंगामही बंद ठेवावे लागणार आहेत. यात कारखान्याचे सुमारे दीड हजार कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचे कारखान्याचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांच्या निवासस्थानी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आदींनी धाव घेऊन त्यांची भेट घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष nana patole यांनीही काडादी यांच्याशी संपर्क साधून धीर दिला. कारखान्यची चिमणी केवळ राजकीय द्वेषापोटी सत्ताधारी भाजपच्या आमदार-खासदारांच्या सांगण्यावरून उपमुख्यमंत्री fadnvis यांनी पाडायला लावली आहे. त्याची किंमत भाजपला चुकवावी लागेल. त्यासाठी congress पक्ष संघर्ष करायला तयार असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आमदार प्रणिती शिंदे यांनी चिमणी पाडकामासह विमानसेवेच्या मुद्यावर भाजपचा जोरदार समाचार घेतला. विमानसेवेसाठी सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाडली हे खरे वाटत नाही. तर केवळ धर्मराज काडादी यांच्या विरोधात व्यक्तिद्वेषातून चिमणी पाडण्यात आली आहे. भाजपच्या आमदार-खासदारांना विमानसेवा सुरूच करायची होती तर बोरामणीच्या नवीन आंतरराष्टूरीय कार्गो विमानतळाच्या विकासासाठी निधी का आणला नाही? केवळ सुशीलकुमार शिंदे यांनी बोरामणी विमानतळ मंजूर करून आणले म्हणून भाजपने निधी दिला नाही, असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. भाजपकडे धमक असेल तर बोरामणीचे विमानतळासह सोलापूरची विमानसेवा सुरू दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिले. सोलापूर-तुळजापूर नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी देताना वाटेत माळढोक अभयारण्याची अडचण का आली नाही? रेल्वे मार्गावर माळढोक पक्षी आडवा नाही का? माळढोक पक्ष्याचा अडथळा बाजूला ठेवून नवीन रेल्वेमार्ग उभारता येते. तर बोरामणी विमानतळ का उभारता येत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.