लोणावळा: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मणिपूरमधील परिस्थितीवर भाष्य केले आहे. आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही असा प्रश्न मणिपूरमधील देशसेवा केलेले निवृत्त लष्करी अधिकारी विचारत आहेत. नायजेरिया, सीरियासारखी अशांतता मणिपूरमध्ये निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती असताना राज्यकर्ते याकडे लक्ष देत नाहीत. हे देशाला न परवडणारे आहे असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते लोणावळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलच्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या समारोपास उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, मणिपूरमधील लष्करातील निवृत्त अधिकारी म्हणतायत आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही?. इतर ठिकाणचे निवृत्त अधिकारी म्हणतायत की नायजेरिया, सीरियासारखी अंतर्गत अशांतता निर्माण झाली. अशी स्थिती असताना राज्यकर्ते याकडे लक्ष देत नाहीत. पुढे ते म्हणाले, नॉर्थईस्ट हा अतिशय संवेदनशील आहे. नेहमी नॉर्थईस्ट आणि काश्मीर यावर लक्ष ठेवावं लागतं. संरक्षण मंत्री असताना आमचं या भागावर लक्ष असायचं. चीन, पाकिस्तान या भागात शांतता कशी राहील तिथं परकीय शक्ती यांना संधी मिळणार नाही याची खबरदारी आम्ही घ्यायची. ते करायचं असेल तर केंद्रसरकार ला अत्यंत जागृत राहावं लागतं. आज इतके दिवस झालं हे चालू आहे. पण एक ही स्टेटमेंट देशाच्या प्रमुखाच मार्ग काढायच्या दृष्टीने केल्याचं बघायला मिळालं नाही.पुढे ते म्हणाले, याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. आम्ही सर्व विरोधक हा प्रश्न घेणार आहोत. यावरच चर्चा करणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी मोदी हे जंगलाचे वाघ आहेत बाकी प्राणी या प्रश्नावर शरद पवार यांनी फडणवीस यांना टोला लगावत पोरकट वक्तव्य करणाऱ्यांवर काय बोलावे असे उत्तर दिले.