मुंबईतील थरारक मीरा रोड हत्याकांड प्रकरणात दररोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहे. आरोपी मनोज सानेने प्रेयसी सरस्वती वैद्यची हत्या करत तिच्या मृतदेहाचे तुकडे शिजवून मिक्सरमध्ये बारिक केले, त्यानंतर मांसाची पेस्ट गटारात फेकून दिल्याचा खुलासा पोलीस तपासात झाला होता. २०१४ पासून सरस्वती वैद्य आणि आरोपी मनोज साने आकाशदीप सोसायटीत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. त्यातूनच मनोजने सरस्वतीची हत्या केली. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एड्स असल्याचा खुलासाही आरोपी मनोजने केला होता. त्यानंतर आता या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन जून रोजी मनोज आणि सरस्वती यांच्यात वाद झाला. सरस्वती मनोजला बोलताना म्हणाली की, तू नेहमीच भांडत असतोस, पूर्वीसारखा वागत नाहीस. त्यामुळं तू माझ्यासोबत बेडरुममध्ये झोपू नकोस, हॉलमध्ये जा. असं सरस्वतीने बजावल्यानंतर मनोज सानेला प्रचंड राग आला. त्यामुळं त्याने सरस्वतीची हत्या केली. त्यानंतर मृतदेहांचे तुकडे केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मनोजने सरस्वतीच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे केले, त्यानंतर कुकरमध्ये सरस्वतीचं मांस शिजवून मिक्सरमध्ये बारीक केलं. त्याची पेस्ट गटारात फेकून दिली. परंतु मनोजच्या घरातून घाण वास येत असल्याने शेजाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर या थरारक घटनेचा भांडाफोड झाला.आरोपी मनोज साने याने किटनाशकांचं औषध देऊन प्रेयसी सरस्वती वैद्यची हत्या केली होती, त्यानंतर त्याने सरस्वतीच्या मृतदेहाचा वास येऊ नये, यासाठी निलगिरीचं तेल, ताक आणि दही घरात आणलं होतं. तसेच रुम फ्रेशनरही मनोजने खरेदी केलं होतं, असं पोलीस तपासातून समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपी मनोजने ज्या-ज्या दुकानातून सामानांची खरेदी केली, त्या सर्व दुकानमालकांचा जबाब नोंदवला आहे. याशिवाय पोलिसांनी मनोजच्या घरातून धारदार शस्त्र, करवत अन्य आक्षेपार्ह साहित्यही जप्त केल्याची माहिती आहे.