प्रेमचंद बियाणी यांचे निधन
औराद शहाजानी: येथील शारदोपासक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रेमचंद रंगलाल बियाणी वय-७१ यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दि.१६ जून २०२३ रोजी मध्यरात्री १२:१५ वाजता निधन झाले.
औराद शहाजानी व परिसरात त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात करून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ सिनेट सदस्य, लातूर अर्बन बँकेचे संचालक म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. शारदोपासक शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत त्यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या निधनामुळे औरादच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून संस्थेचे भरून न निघणारे नुकसान झाल्याची भावना शारदोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बसवराज वलांडे यांनी व्यक्त केली.
त्यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी ४:०० वाजता औराद शहाजानी येथील मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या पश्चात उद्योजक पंकज बियाणी, सीए नरेंद्र बियाणी ही मुले, एक मुलगी, नातवंडे, स्नुषा व मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल शारदोपासक शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बगदुरे, उपसचिव राजेश वलांडे, संचालक किसनरेड्डी भिंगोले, मडोळय्या मठपती, शिवाजीराव जाधव, दगडू गिरबणे, अनिल डोईजोडे, विजयकुमार पाटील निलंगेकर, डॉ.ज्ञानेश्वर कदम, प्राचार्य डॉ.व्ही.एल.एरंडे, ॲड. जमालपूरकर, ॲड.व्यंकट बेद्रे, ॲड.राम गुणाले आदींनी शोक व्यक्त केला. यावेळी औरादची बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. अंत्यविधीसाठी मोठ्या संख्येने औराद व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(अनेक वर्षांपासून माझे बियाणी परिवाराशी कौटुंबिक संबंध आहेत. शारदोपासक शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत त्यांचे अमूल्य योगदान राहिले आहे. अत्यंत मृदू व मितभाषी सहकारी आम्ही गमावला आहे. त्यांच्या निधनाने औरादच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय क्षेत्राचे नुकसान झाले आहे. -रमेश बगदुरे, सचिव, शारदोपासक शिक्षण संस्था, औराद शहाजानी)