किल्लारी ची व्यवस्थापकीय धुरा आ. अभिमन्यू पवार यांच्याकडे…
औसा – गेल्या आनेक वर्षांपासून किल्लारी साखर कारखाना बंद असल्याने दोन जिल्हे व चार तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांना विविध समस्यांना समोरे जावे लागत होते. हा कारखाना सुरु करण्याचा शब्द आमदार अभिमन्यू पवारांनी किल्लारीकरांना दिला आणि यंदा तो सुरु करुन साखरही काढली. मात्र पूर्ण क्षमतेने हा कारखाना यंदा सुरु करता आला नसला तरी पुढच्या हंगामाला तो क्षमतेने सुरु करण्यासाठी कारखान्याच्या व्यवस्थापनेत कांही धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक होते. मात्र यामध्ये कांही तांत्रीक बाबींची आडचण येत होती ती आडचण प्रादेशीक सहसंचालक (साखर) यांनी सोडवीली आहे. त्यांनी नविन आदेश काढून आमदार अभिमन्यू पवारांना व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष केल्याने हा कारखाना पूर्ण क्षमंतेने व सुरळीत सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आमदार अभिमन्यू पवारांच्या अथक प्रयत्नाने किल्लारी साखर कारखान्याचे पुनर्जीवीत करण्यात आला. या कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यास शासनाच्या मंजुरीसह भागभांडवलाची तजवीज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून केली. कारखाना दुरुस्तीसाठी लागणारे भांडवल त्यांनी स्वःताच्या हमीवर लोकांकडून गोळा केले. कारखाना थकबाकीत असल्याने कोणतीही बँक कर्ज देण्यासाठी तयार नसतांना आमदार अभिमन्यू पवर यांनी कारखाना सुरु करण्याचा चंग बांधला. शासनाने या कारखान्यावर व्यवस्थापन समिती गठीत करुन त्यावर उपनिबंधक सहकारी संस्था औरंगाबादचे पी.आर. फडणीस व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातुर एस.आर. नाईकवाडी यांची नेमणुक केली होती. मात्र आमदार अभिमन्यू पवार यांना या व्यवस्थापन समितीत स्थान नसल्याने प्रत्यक्ष निर्णय वा कारखान्याच्या व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कांही निर्णय घेता येत नव्हते. मात्र गुरुवारी (दि. १५) साखर सहसंचालक एस.बी. रावल यांनी या समितीवर अद्यक्ष म्हणून आमदार पवारांची नेमणुक केल्याचे पत्र काढले. यामुळे या कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने आमदार पवारांची निवड कारखाना सुरु होण्यासाठी व तो सुरळीत चालण्यासाठी महत्वाची मानली जात आहे. प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत आमदार अभिमन्यू पवारांना स्थान मिळाल्याने हा कारखाना संकटातून बाहेर येईल असा विश्वास मतदारसंघातील लोकांना आहे.