लातूर : शिक्षणाच्या क्षेत्रात लातूर आता पुणे आणि मुंबईला देखील मागे टाकतांना दिसत आहे. या पूर्वी १० आणि १२ वीचा लातूर पॅटर्न सर्वांनी ऐकला आहे. या परीक्षेत लातूर अव्वल स्थानी होता. आता त्या पाथोपाठ पुन्हा एक नवा पॅटर्न लातूरने तयार केला आहे. हा नवा पॅटर्न म्हणजे नीट पॅटर्न असून या वर्षी नीट परीक्षेत तब्बल दोन-अडीच हजार मुलं पास झाली असून त्यांना ५०० पेक्षा अधिक गुण आहेत. यामुले एकाच जिल्ह्यातील सर्वाधिक डॉक्टर तयार करण्याचा नवा विक्रम आता लातूरचे विद्यार्थी बनवणार आहेत.मंगळवारी रात्री नीट परीक्षेचा निकाल लागला आणि त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. यामुळे लातूरने आता नीट परीक्षेचा नवा पॅटर्न सेट केला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात पूर्व परीक्षांचा निकाल कोविड नंतर मंदावला होता. मात्र यावर्षी निकालाने सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. यावर्षी लातूर मधील दोन हजार पेक्षा जास्त मुले ही नीट परीक्षेत पास झाली असून ते वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यास पात्र ठरले आहेत.
एकाच शहरातील काही मोजक्या महाविद्यालयातून तब्बल १२०० पेक्षा जास्त विद्यार्थी हे नीट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यात ७२० गुणांपैकी ७०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही चार तर ६५० पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही ५५ पेक्षा जास्त आहे. तर ६०० गुण घेणारे २२३ पेक्षा जास्त विद्यार्थी असून ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.नीटच्या ६४०० जागांसाठीचा निकाल हा मंगळवारी रात्री लागला आहे. त्यामध्ये एकट्या लातूर जिल्ह्यातून २००० पेक्षा जास्त विद्यार्थी असल्याचं स्पष्ट आहे. या परीक्षेचा निकाल अद्याप अपडेट केला जात आहे. त्यामुळे या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. हाच तो लातूर पॅटर्न आहे, येथील विद्यार्थ्यानी एकाच शहरातून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एवढ्या मोठ्या संख्येने प्रवेश घेण्यासाठी पात्र होण्याचा विक्रम रचला आहे.नीट परीक्षेत राज्यातील तब्बल १३१००८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यातील सर्वाधिक विद्यार्थी हे लातूरचे असल्याची माहिती पुढे आली आहे. लातूरच्या राजश्री शाहू महाविद्यालयातील ५०० ते ७०० गुण घेणारे तब्बल ४३१ विद्यार्थी आहेत. कोविड काळानंतर लागलेला हा विक्रमी निकाल आहे. लातूर मधील अनेक महाविद्यालय त्याचबरोबर इथल्या कोचिंग क्लासेसने देखील नीट परीक्षेत चांगले यश मिळवले आहे.