• Thu. Aug 21st, 2025

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांनी केली कृषि सेवा केंद्रांची तपासणी

Byjantaadmin

Jun 15, 2023

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांनी केली अहमदपूर, चाकूर तालुक्यातील कृषि सेवा केंद्रांची तपासणी

लातूर(जिमाका): जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात उच्च प्रतीचे बियाणे, खते मिळवीत, यासाठी कृषि विभागामार्फत कृषि सेवा केंद्रांना विविध सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांच्या अंमलबजावणीची आढावा घेण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांनी आज अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील काही कृषि सेवा केंद्रांना भेटी देवून तेथील बियाणे, रासायनिक खतांच्या साठ्याची तपासणी केली. तसेच यापुढे इतरही ठिकाणी अचानक कृषि सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी पी. पी. देवकते, अहमदपूर पंचायत समितीचे कृषि अधिकारी श्री. आयलवार यावेळी त्यांच्या सोबत होते. शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे, खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दिल्या आहेत. त्यानुसार कृषि विभागामार्फत नियोजन व उपाययोजना केल्या जात आहेत.

जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे, खते उपलब्ध करून द्यावीत. तसेच बियाणे, खते विक्री करताना लिंकिंग करू नये, चढ्या दराने विक्री करू नये. कृषि सेवा केंद्रात उपलब्ध बियाणे आणि खतांचा साठा, त्यांचे दर दर्शनी भागात लावण्याच्या सूचना दिल्या असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांनी सांगितले.

लिंकिंग अथवा चढ्या दराने खते, बियाणे विक्री करणाऱ्या कृषि सेवा केंद्रांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येणार असून याबाबत सर्व कृषि सेवा केंद्रांना अवगत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याबाबतच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदवून घेण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या तक्रारींची दखल घेवून आवश्यक कार्यवाही करण्यासाठी भरारी पथकेही स्थापन केली असल्याचे श्रीमती शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *