• Thu. Aug 21st, 2025

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून मिळते  वैयक्तिक शेततळ्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान

Byjantaadmin

Jun 15, 2023

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून मिळते  वैयक्तिक शेततळ्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान

पावसावर विसंबून असलेल्या कोरडवाहू शेतीमधील पिकांसाठी शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळ्याचा लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी 75 टक्के म्हणजेच सुमारे 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महा-डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

यापूर्वी मागेल त्याला शेततळे योजनेतून वैयक्तिक शेततळ्यांचा लाभ दिला जात होता. या योजनेतून जास्तीत जास्त 50 हजार रुपयापर्यंत अनुदान देय होते. आता मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी 75 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 75 हजार रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. क्षेत्र धारण कमाल मार्यादा नाही. शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी. अर्जदाराने यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून शेततळ्यासाठी अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

लाभार्थी निवडीचे निकष आणि अनुदान

महाडीबीटी पोर्टलवर कृषि विभागाने विकसित केलेल्या प्रणालीद्वारे एकत्रित सोडतीमध्ये शेततळ्यासाठी लाभार्थी निवडीचा निर्णय घेतला जातो. उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडतीनुसार लाभ दिला जातो. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना शेततळ्याच्या आकारमानानुसार 14 हजार 433 रुपयांपासून 75 हजार रुपयांपर्यंतच्या मर्यादेत अनुदान दिले जाते. शेततळ्याचा आकार 15X15X3 पासून 34X34X3 मीटर पर्यंत असू शकतो. जास्त आकारमानाचे शेततळे घेण्यासाठी मंजूर अनुदानापेक्षा जास्त लागणारा खर्च लाभार्थ्यानी स्वत: करायचा आहे.

असा घ्या योजनेचा लाभ

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शेततळ्यासाठी वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करावी. आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे व वैयक्तिक तपशील व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती भरावी. अर्जाचे शुल्क 23 रुपये 60 पैसे असे आहे. अर्जासोबत सातबारा, आठ अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, जातीचा दाखला व हमीपत्र इ. कागदपत्रे अपलोड करावीत. नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *