एलॉन मस्क यांनी गुरुवारी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी ट्वीट करत मस्क यांचे अभिनंदन केले आहे. आता ट्विटर भडकाऊ भाषण देणाऱ्यांविरोधात कारवाई करेल, अशी अपेक्षा आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
एलॉन मस्क यांचे अभिनंदन करत राहुल गांधी म्हणाले, “मला विश्नास आहे की ट्विटर आता भडकाऊ भाषण देणाऱ्यांविरोधात कारवाई करेल. तसेच सत्यता योग्य प्रकारे पडताळ्यात येईल आणि सरकारच्या दबावामुळे भारतातील विरोधकांचा आवाज दाबला जाणार नाही”, असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.
या ट्वीट बरोबर राहुल गांधी यांनी एक आलेखही शेअर केला आहे. यात त्यांनी ऑगस्ट २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान त्यांच्या ट्विटर खात्याशी छेडछाड झाल्याचा दावा केला आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२१ दरम्यान त्यांच्या फॉलोअर्समध्ये वाढ होत होती. परंतु ऑगस्ट २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान त्यांच्या फॉलोअर्सची वाढ अचानक थांबली. तसेच फेब्रुवारी २०२२ नंतर त्यांचे फॉलोअर्स पुन्हा वाढू लागले, असे या आलेखात दाखवण्यात आले आहे.
दरम्यान, ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांची हकालपट्टी केली होती. तसेच त्यांनी एक ट्वीट करत ट्वीटर विकत घेण्याच्या उद्देशाबाबत माहिती दिली होती. ‘‘भविष्यातील नागरिकांसाठी एक डिजिटल चौक असणे आवश्यक आहे, त्यामुळेच मी ट्वीटर खरेदी केले आहे. याठिकाणी विविध विचारसरणीचे लोक हिंसा टाळून वादविवाद करू शकतील. सध्या समाजमाध्यमे अतिउजवे आणि अतिडावे यात विभागली जाण्याची भीती आहे. त्यामुळे तिरस्कार आणि समाजातील दरी वाढत जाईल,’’ असे ते म्हणाले होते.