पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांत पोलिसांसाठी ‘एक राष्ट्र, एक गणवेश’अशी संकल्पना मांडली आहे. त्यावर काँग्रेसने सडकून टीका केली आहे. मोदींचीही संकल्पना देशातील लोकशाही व संविधान दोघांसाठी घातक आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली आहे.
सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, सर्व राज्यांतील पोलिसांना एकच गणवेश, अशी संकल्पना मोदींनी मांडली आहे. मात्र, राज्यांचे पोलिस दल त्या राज्याची ओळख असते. ती ओळख पुसण्याची कल्पना संघराज्य प्रणालीच्या विरोधात आहे. राज्यांना कमकुवत करुन केंद्र ताकदवर होणे, देशाला एकाच रंगात रंगवणे हे विविधता शक्ती असलेल्या देशातील लोकशाही व संविधान दोघांसाठी घातक आहे.
याशिवाय ‘राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) केंद्रीय तपास यंत्रणेचे रूप मिळावे अशी सरकारची इच्छा आहे, आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी प्रत्येक राज्यामध्ये ‘एनआयए’चे कार्यालय सुरू करण्यात येईल,’ असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, कायदा सुव्यवस्था हा संविधानातील राज्य सूचीतील विषय म्हणजेच प्रामुख्याने राज्यांची जबाबदारी आहे. आज केंद्रीय यंत्रणांचा सुळसुळाट करुन राज्य तपास यंत्रणांना मोदी सरकार निष्प्रभ बनवत आहे. हे ही संघराज्य प्रणालीच्या विरोधात आहे.
काय म्हणाले होते मोदी?
अंतर्गत सुरक्षा या मुद्द्यावर सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांचे चिंतन शिबिर काल नवी दिल्ली येथे झाले. या शिबिराला संबोधित करताना मोदी म्हणाले होते की, सर्व राज्यांत पोलिसांसाठी ‘एक राष्ट्र, एक गणवेश’ असे हवे. तसेच, ही संकल्पना थोपली जाऊ नये, तर तिच्यावर विचार व्हावा. पोलिसांबाबत चांगली धारणा कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्याआधी तयार केलेल्या कायद्याचा आढावा घ्यावा तसेच सध्याच्या संदर्भात त्यात दुरुस्ती करावी, असे आवाहनही मोदी यांनी राज्य सरकारांना केले होते. मात्र, मोदींच्या या संकल्पनेवर काँग्रेसने टीका केली आहे.