पत्नीला कुटुंबातील कामे करायला सांगितले तर ते क्रौर्य होत नसल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी दिला आहे.
सारंग दिवाकर आमले यांच्यासह त्याच्या आई व बहिणीच्या विरोधात नांदेड पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४९८ (अ) नुसार दाखल गुन्हाही रद्द करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. नांदेडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समोर सुरू असलेली प्रकरणाची कार्यवाही खंडपीठाच्या निर्णयामुळे स्थगित होणार आहे. नांदेड येथील सृष्टीचे लग्न पुणे येथील सारंग दिवाकर आमले (४१) यांच्याशी झाले. सृष्टीच्या फिर्यादीवरून पती सारंग, सासू सरोज दिवाकर आमले (७१), आणि नणंद दीप्ती आशुतोष आठल्ये (४३) यांच्याविरुद्ध नांदेडच्या भाग्यनगर ठाण्यात कलम ४९८(अ), ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिघांनी गुन्हा रद्द करण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. आपल्याकडून माेलकरणीप्रमाणे काम करून घेतले जाते, हे एक प्रकारचे क्रौर्य असल्याचे फिर्यादीत म्हटले होते. विवाहित स्त्रीला घरकामासंबंधी विचारणा केली असेल तर ती कुटुंबाच्या उद्देशानेच केली जाते, असे खंडपीठाने स्पष्ट केले. त्यातून संबंधित स्त्रीला मोलकरीण समजणे असा अर्थ होत नाही.
न्यायालय म्हणाले, मुलींना घरकाम करायचे नसल्यास लग्नापूर्वी सांगावे
जर विवाहितेला घरकाम करायचे नसेल तर तिने विवाहापूर्वीच सांगणे गरजेचे असून अशी अडचण त्यातून दूर झाली असती, असेही नमूद केले. पत्नीने सासरच्या विरोधात दिलेल्या तक्रारीत चारचाकी वाहन खरेदीसाठी चार लाख मागितल्याचा तसेच पतीकडून मानसिक व शारीरिक छळ झाल्याचे म्हटले होते.