मुंबई:-मिंधे आणि कमळाबाईच्या अभद्र हातमिळवणीनंतर गुजरातला ‘अच्छे दिन’ तर महाराष्ट्राच्या वाट्याला ‘लुच्चे दिन’ आले आहेत. महाराष्ट्रात होणारे 1 लाख 80 हजार कोटींचे चार मोठे प्रकल्प गेल्या तीन महिन्यांमध्ये परराज्यात गेले असून यातील तीन प्रकल्प गुजरातने पळवले आहेत, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रात खोके सरकार सत्तारूढ झाल्यानंतर केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपच्या तालावर सगळा कारभार सुरू असल्याचे चित्र आहे. यात लवकरच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱया गुजरातला खूश करण्याचा सपाटाच लावण्यात आला आहे. राज्यातील मोठ्या प्रकल्पांची पळवापळवी सुरू असून ‘मिंधे’ काहीच हालचाल करत नसल्याने आतापर्यंत चार प्रकल्प हातून निसटले आहेत. लागोपाठ चार प्रकल्प हातून निसटल्याने राज्यातील तरुणांची दीड लाख नोकऱ्यांची संधीही हिरावली गेली आहे.
4 महिन्यांत चार प्रकल्प गेले
1) वेदांता फॉक्सकॉन
शिवसेनेने म्हटले आहे की, गेल्या महिन्यात 1.54 लाख कोटींचा वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्पही महाराष्ट्राकडून हिसकावून घेण्यात आला. या कंपनीचा सेमिकंडक्टर निर्मिती प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे उभारला जाणार होता. मात्र कंपनीने अचानक गुजरातमधील ढोलेरा येथे हा प्रकल्प उभारण्यासंदर्भात गुजरात सरकारसोबत सामंजस्य करार केला.
2) बल्क ड्रग पार्क
औषध निर्मिती क्षेत्रातील वेगवेगळ्या कंपन्यांचा समावेश असलेला बल्क ड्रग पार्क प्रकल्प महाराष्ट्रात होईल अशी अपेक्षा होती. हा प्रकल्प जवळपास तीन हजार कोटींचा होता. या प्रकल्पातून 50 हजार लोकांच्या हाती रोजगार लागणार होता. यासाठी रोहा आणि मुरुड येथे पाच हजार एकर जागा देण्याची तयारी महाराष्ट्र सरकारकडून दर्शविण्यात आली होती. मात्र 1 सप्टेंबर रोजी केंद्राने हिमाचल प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये हा प्रकल्प दिला.
3) वैद्यकीय उपकरण निर्मिती प्रकल्प
केंद्र सरकारने गेल्याच आठवडय़ात महाराष्ट्र सरकारकडून आलेला 424 कोटींचा वैद्यकीय उपकरण निर्मिती प्रकल्प नाकारला. हा प्रकल्प संभाजीनगरमधील ऑरीक सिटीमध्ये उभारण्यात येणार होता. मात्र आता तो तामीळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये हलवण्यात आला आहे.
4) आता टाटा एअरबस
‘टाटा एअरबस’ हा 22 हजार कोटींचा विमान निर्मिती कारखाना गुजरातमधील वडोदरा येथे उभारण्यात येणार आहे. गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्राच्या हातून निसटलेला हा चौथा प्रकल्प ठरला. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा प्रकल्प नागपूरमधील मिहान येथे उभारण्यासंदर्भातील दावे केले होते. ते दावे पह्ल ठरले. या प्रकल्पात 6 हजार नोकऱया मिळाल्या असत्या.
दारू घेता का?
शिवसेनेने म्हटले आहे की, सध्या राज्यात जे बरे घडते आहे ते फक्त तीन महिन्यांपूर्वी जो सामना मिंधे गटाने जिंकला त्यामुळेच. मुख्यमंत्री एकीकडे 30 लाख शेतकऱ्यांना चार हजार कोटींची मदत दिली असे ‘बुडबुडे’ सोडत आहेत तर तिकडे उद्ध्वस्त शेतकरी ‘मदत देता का, मदत?’ असा टाहो सरकारकडे फोडीत आहे आणि राज्याचे कृषीमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना ‘तुम्ही दारू घेता का, दारू?’ असा प्रश्न करीत आहेत. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या घरचे दिवे अजूनही विझलेलेच का आहेत, याचे उत्तर कृषीमंत्र्यांच्या या प्रश्नात दडलेले आहे.
राज्यातील स्थितीवरून सरकारवर टीका करत असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. ‘दिवाळीचा सण म्हणजे एक चैतन्य पर्वच असते. हे चैतन्य पर्व यावेळी अत्यंत जल्लोषात साजरे झाले. सर्व काही थाटामाटात, आनंद उत्साहात साजरे झाले. धनतेरस, लक्ष्मीपूजन, पाडवा वगैरे प्रत्येक दिवस मस्त झगमगाटात साजरा झाला. व्यापारी वर्गाचे चोपडा पूजन झाले. नरक चतुर्दशीस अनेक नरकासुर पायाखाली कचाकच चिरडून मारले गेले. भाऊबीजेचा थाटही यावेळी वेगळाच होता. गेल्या ७५ वर्षांत हा थाटमाट देशाने कधीच पाहिला नव्हता, पण हे सर्व घडू शकले ते दिल्लीत पंतप्रधान मोदी व महाराष्ट्रात श्री. मिंधे व फडणवीसांचे सरकार असल्यामुळेच, असा खोचक टोला पंतप्रधान मोदी यांना लगावण्यात आला आहे.