• Sun. Aug 24th, 2025

घरगुती सिलिंडर ५०० रुपयांत, १०० युनिट वीज माफ; प्रियंका गांधीच्या मध्य प्रदेशात ५ मोठ्या घोषणा

Byjantaadmin

Jun 12, 2023

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी जबलपूर येथून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचाराला सुरुवात करताना प्रियंका गांधी यांनी जनतेला ५ मोठी आश्वसने दिली. ज्यात महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी घरगुती सिलिंडर ते वीजबिलपर्यंत अनेक महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले. काँग्रेसचा पक्ष सत्तेत येताच सर्व आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचाराची सुरुवात करताना प्रियंका गांधी वढेरा म्हणाल्या की, “राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास लोकांना १०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. याशिवाय २०० युनिटचा वापर होईपर्यंत केवळ निम्मे शुल्क आकारले जाईल. मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार आल्यास ५०० रुपयांना एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन प्रियंका गांधी यांनी महागाईने होरपळणाऱ्या लोकांना विशेषत: महिलांना दिले. यासोबतच त्यांनी महिलांना आणखी एक वचन दिले. सत्तेत आल्यावर महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातील, जेणेकरून त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या दिशेने पाऊल टाकू शकतील, असेही त्या म्हणाल्या.

मध्य प्रदेशच्या नागरिकांसाठी काँग्रेसचे आश्वासन

– महिलांना दरमहा १५०० रुपये

– घरगुती सिलिंडर ५०० रुपये

– १०० युनिट वीज माफ

– २०० युनिट वीज अर्ध्या किंमतीत

– जुनी पेन्शन योजना लागू

– शेतकऱ्यांना कर्जमाफी

नुकतीच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला धोबीपछाड दिला. यामुळे काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास वाढला असून त्यांनी नागरिकांच्या आवश्यक गोष्टींचा मध्य प्रदेश निवडणुकीच्या प्रचारामध्ये समावेश केला आहे. ज्यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा सत्तेत येण्यास मदत होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *