देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या मिरारोड येथील निर्घृण हत्याकांडाचा आरोपी मनोज साने याच्या क्रूर कृत्याच्या रोज नव्या कहाण्या उजेडात येत आहेत. सरस्वती वैद्यच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर मनोज साने यानं तिचे फोटो काढले होते. दुर्गंधी येऊ नये म्हणून त्यानं निलगिरीच्या तेलाच्या पाच बाटल्या विकत घेतल्या होत्या, अशी माहिती आता चौकशीत समोर आली आहे.नराधम मनोज साने हा सध्या पोलीस कोठडीत आहे. तिथं त्याची कसून चौकशी सुरू आहे. साने हा रोजच्या रोज आपला कबुलीजबाब बदलत असला तरी पोलीस त्यातून अनेक घटनांची संगती लावत आहेत. सरस्वती वैद्यचा खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची ही माहिती घेण्यासाठी मनोज साने यानं अनेक वेळा गुगल सर्च केलं होतं.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाचे तुकडे करताना सानेनं खरेदी केलेल्या लाकडं कापण्याच्या कटरची साखळी निसटली होती. ती दुरुस्त करण्यासाठी तो पुन्हा त्याच दुकानात गेला होता. मृतदेह कापलेलं कटर सानेनं चांगलं स्वच्छ केलं होतं, त्यामुळं त्यानं नेमकं ते कशासाठी वापरलं याचा पत्ताही कुणाला लागू शकला नाही. मृतदेहातून दुर्गंधी येऊ नये म्हणून काय करायचं याची माहितीही त्यानं गुगलवरून घेतली होती. त्यानंतर त्याच परिसरातील एका दुकानातून त्यानं निलगिरी तेलाच्या पाच बाटल्या आणल्या होत्या.मनोज साने आणि सरस्वती वैद्य यांनी लग्न केलं होतं. मात्र, वयामध्ये जास्त अंतर असल्यामुळं ही गोष्ट ते लोकांपासून लपवत होते. बोरिवलीतील एका मंदिरात दोघांनी लग्न केल्याचं मनोज साने यानं म्हटलं आहे. पोलीस आता त्याची शहानिशा करत आहेत. साने आणि वैद्य यांनी जिथं लग्न केलं ते ठिकाण आणि त्यांचं लग्न लावणाऱ्या पुजाऱ्याचा शोध घेतला जात आहे. त्यांच्या लग्नाला आणखी कोण साक्षीदार आहेत, याचा शोध पोलीस घेणार आहेत.वयाच्या फरकामुळे या जोडप्याने ओळखीच्या लोकांपासून लग्न लपवून ठेवल्याचे समोर आले आहे. साने हे गेल्या तीन वर्षांपासून मीरा रोड परिसरातील आकाशगंगा इमारतीतील भाड्याच्या फ्लॅटमध्ये वैद्य यांच्याकडे राहत होते.