• Mon. Aug 18th, 2025

शरद पवारांना धमकी देणारा अटकेत; ओळख लपवण्यासाठी ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाचा वापर

Byjantaadmin

Jun 12, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका तरुणाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. सागर बर्वे असं (वय ३२) या तरुणाचं नाव आहे. नर्मदाबाई पटवर्धन या नावाचा वापर करून त्यानं फेसबुक पेजवरून धमकी दिली होती.’तुमची गत दाभोलकरांसारखी होईल’ अशा शब्दांत मागील आठवड्यांत शरद पवार यांना धमकी देण्यात आली होती. यामुळं खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ज्येष्ठ नेत्यांसह मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार केली होती. तसंच, या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती. शरद पवार यांना काही झाल्यास त्याची जबाबदारी राज्यातील व केंद्रातील गृहमंत्र्यांची असेल असंही सुप्रिया सुळे यांनी बजावलं होतं. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला होता

शरद पवारांना धमकी देणारी पोस्ट ज्या कम्प्युटरवरून अपलोड करण्यात आली होती, त्याचा आयपी अ‍ॅड्रेस सागर बर्वेशी संबंधित होता. याचा उलगडा होताच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सागर बर्वे याला अटक केली. त्याला रविवारी एस्प्लेनेड कोर्टात हजर करण्यात आलं. त्याला १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.सागर बर्वे हा आयटी प्रोफेशनल आहे. तो कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचं पोलिसांनी प्राथमिक चौकशीअंती स्पष्ट केलं. मात्र, या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *