गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि महाराष्ट्रात लव्ह जिहादवरून राजकीय वाद पेटला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी यावरून एकमेकांवर गंभीर आरोप केले आहे. हिंदुत्ववादी संघटना धर्मांतरण आणि लव्ह जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी राज्यातील अनेक शहरांमध्ये आंदोलन करत असल्याचं दिसून येत आहे. परंतु आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी लव्ह जिहादवर स्वत:च्याच पक्षाला खडेबोल सुनावले आहे. दोन व्यक्ती प्रेमाच्या भावनेतून एकत्र येत असतील तर त्याचा सन्मान करायला हवा, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळं आता यावरून भाजपातील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणााल्या की, लव्ह जिहाद हा केंद्रातील मोदी सरकारचा कधीही अजेंडा राहिलेला नाही. विकास हाच आमचा अजेंडा आहे. प्रेम हे प्रेम असतं, त्याला कोणत्याही मर्यादा नसतात. जर दोन आंतरधर्मीय व्यक्ती निखळ प्रेमातून एकत्र येत असतील तर त्याचा सर्वांनीच आदर करायला हवा, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. तसेच हिंदू महिलांना आंतरधर्मीय विवाहांच्या माध्यमातून फसवलं जात असेल तर त्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला हवं, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे अनेक नेते लव्ह जिहादवरून वादग्रस्त वक्तव्ये करत असताना पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, नाशिक आणि ठाण्यासह अनेक शहरांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून मोर्चे काढण्यात येत आहे. त्यात धर्मांतरण आणि लव्ह जिहादवर कायदा करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच या मोर्चांमध्ये भाजपा नेत्यांनीही सहभाग घेत हिंदुत्ववादी संघटनांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. त्यातच आता पंकजा मुंडे यांनी वेगळी भूमिका घेतल्याने त्यावरून भाजपात काहीही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे.