• Mon. Aug 18th, 2025

अमळनेरमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक; संचारबंदी लागू

Byjantaadmin

Jun 10, 2023

जळगाव : अमळनेर शहरात रात्री दोन गटातील वादातून तुफान दगडफेकही करण्यात आली. पोलिसांनी वेळीच धाव घेत शांतता प्रस्थापित केली असून खबरदारीचा उपाय म्हणून शहरात शनिवार ते सोमवार या काळात संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये व शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.अमळनेर शहरातील जीनगर गल्ली, जुना पारधीवाडा आणि सराफ बाजार परिसरात रात्री अल्पवयीन मुलांच्या किरकोळ भांडणातून सामाजिक तेढ निर्माण होऊन दगडफेक झाली. त्यामुळे शहरात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. दोन गट परस्परांना भिडले. दुकानाची तोडफोड झाली. अनेक घरांवर दगडफेक झाली आहे. या घटनेमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. शहराची कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रात्री उशिरा जळगावहून जादा कुमक मागवण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर, सहाय्यक निरीक्षक राकेशसिंग परदेशी व पोलीस कर्मचार्‍यांनी धाव घेत उपद्रवींचा शोध सुरू केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Amalner city, Stone pelting, curfew, police action

जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनीही अमळनेरमध्ये भेट देऊन आढावा घेतला. दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असून नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केले. दगडफेकीच्या घटनेनंतर अमळनेर शहरात शनिवारी सकाळी ११ ते सोमवारी सकाळी ११ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आवश्यकता वाटल्यास संचारबंदीत आणखी वाढ केली जाणार आहे. शहरातील नागरिकांनी या काळात आपापल्या घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी कैलास कडलग यांनी केले आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती, संस्था, संघटनांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संबंधित आदेश शासकीय दौरे, शासकीय कर्तव्यावर हजर अधिकारी, कर्मचारी, पोलीस, रुग्णसेवा, दूध व पाणीपुरवठा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, तसेच शहरातील सरकारी, खासगी बँक, पतसंस्था, विवाह व अंत्यविधी यांना आदेश लागू राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *