आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. नांदेड जिल्हा हा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जातो. चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात आज अमित शाह यांची तोफ धडाडणार आहे.या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह यांचं नांदेडमध्ये स्वागत पण नांदेडच्या जनतेची साथ काँग्रेसला आहे, हा आजपर्यंतचा अनुभव असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
चव्हाण यांनी नेमकं काय म्हटलं?
अमित शाह यांचे नांदेडमध्ये स्वागत पण नांदेडच्या जनतेची साथ काँग्रेसला आहे, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. भाजपच्या सर्व्हेत नांदेड जिल्हा त्यांच्यासाठी कमकुवत आहे. ज्या ठिकाणी भाजप कमकुवत आहे, त्या ठिकाणी पक्षाकडून जोर लावला जात आहे. अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी यावेळी दिली आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की, नांदेडची जागा काँग्रेससाठी अनुकूल आहे. त्यामुळे भाजप इथे शक्ती लावत आहे. नांदेडच्या जनतेची साथ काँग्रेसला असते हा आजपर्यंतचा अनुभव आहे . नांदेड आणि राज्यात महाविकास आघाडी भाजपचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
शहांच्या सभेकडं राज्याचं लक्ष
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडमध्ये सभा होणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेला महत्त्व प्राप्त झालं आहे. भाजपकडून आज नांदेडमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नेमकं काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.