• Mon. Aug 18th, 2025

…म्हणून बृजभूषणला अटक करणं गरजेचं”, विनेश फोगाटचं ट्वीट व्हायरल; म्हणाली, “पोलिसांनी आम्हाला…!”

Byjantaadmin

Jun 10, 2023

भारताला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकं जिंकून देणाऱ्या महिला कुस्तीपटू लैंगिक शोषणाविरोधात न्याय मागण्यासाठी आंदोलन करत आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारने १५ जूनपर्यंत तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल करण्याचं आश्वासन दिलं आहे. तोपर्यंत कुस्तीपटूंनी आपलं आंदोलन स्थगित केलं आहे. एकीकडे या घडामोडी घडत असताना कुस्तीपटूंच्या चौकशीसंदर्भात वेगवेगळ्या चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. याबाबत या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या कुस्तीपटूंपैकी एक विनेश फोगाटनं केलेलं ट्वीट सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये विनेश फोगाटनं माध्यमांमध्ये होत असलेल्या चर्चांवर नाराजी व्यक्त केली आहे.

vinesh phogat

नेमकं काय घडतंय दिल्लीत?

महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. ६ कुस्तीपटूंनी यासंदर्भात तक्रार केली आहे. गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून दिल्लीत या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. नुकतीच केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी कुस्तीपटूंच्या झालेल्या प्रदीर्घ बैठकीत १५ जूनपर्यंत तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. मात्र, दुसरीकडे महिला कुस्तीपटूंपैकी अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी आपण बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाची खोटी तक्रार केल्याचा जबाब दिल्यामुळे आंदोलनाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.या प्रकरणी आता महिला कुस्तीपटूंचीही चौकशी केली जात असून त्यावरून तर्क-वितर्क लावले जात आहेत. याबाबत विनेश फोगाटनं ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे. “महिला कुस्तीपटू पोलीस तपासासाठी क्राईम साईटवर (घटनास्थळ) गेल्या होत्या. पण माध्यमांमध्ये असं चालवलं गेलं की त्या तडजोड करण्यासाठी गेल्या आहेत”, अशा शब्दांत विनेश फोगाटनं आपली नाराजी व्यक्त केली आहे.

“…नाहीतर न्याय मिळणं शक्य नाही”

दरम्यान, बृजभूषण सिंह यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी कुस्तीपटूंकडून करण्यात आली आहे. या मागणीचं समर्थन विनेश फोगाटनं ट्वीटमध्ये केलं आहे. “बृजभूषणची ताकदच ती आहे. तो आपल्या ताकदीच्या जोरावर, राजकीय प्रभावाच्या जोरावर आणि खोट्या दाव्यांच्या आधारावर महिला कुस्तीपटूंना त्रास देत आहे. म्हणून त्याला अटक करणं गरजेचं आहे. पोलिसांनी आम्हाला त्तरास देण्याऐवजी त्याला अटक केला तर न्यायाची अपेक्षा ठेवता येईल. नाहीतर ते शक्य नाही”, असंही विनेश फोगाटनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.दरम्यान, या प्रकरणी जवळपास १२५ साक्षीदारांची साक्ष पोलीस घेत असून त्यामध्ये अनेक आजी-माजी कुस्तीपटू, पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *