मिरारोड हत्याकांडातील आरोपी मनोज साने यानं पहिल्या दिवशीचा त्याचा कबुलीजबाब बदलला असून आता त्यानं वेगळीच माहिती दिली आहे.
देशाला हादरवून टाकणाऱ्या मिरारोड हत्याकांडातील आरोपी मनोज साने हा रोजच्या रोज आपला कबुलीजबाब बदलत आहे. सरस्वती वैद्य विष पिऊन मेली असं सुरुवातीला सांगणाऱ्या साने यानं आता मीच तिला चाकून भोसकून मारल्याचं म्हटलं आहे. मला कुठलाही पश्चात्ताप नसून मीही स्वत:ला संपवणार होतो, असंही त्यानं पोलिसांना सांगितल्याचं समोर आलं आहे.अनेक वर्षे सोबत राहणाऱ्या प्रेयसीचा खून करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करणारा, ते कुकरमध्ये शिजवणारा, मिक्सरमध्ये बारीक करणारा आणि कुत्र्यांना खाऊ घालणारा थंड डोक्याचा क्रूरकर्मा मनोज साने सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. तिथं त्याची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, तो रोजच्या रोज वेगळी माहिती पोलिसांना देत आहे.
अटकेनंतर पहिल्याच दिवशी सानेनं वेगळाच कबुलीजबाब दिला होता. मी सरस्वतीला मारलं नाही. ती विष प्यायली होती. त्यामुळं तिचा मृत्यू झाला, मात्र हे प्रकरण आपल्यावर शेकेल या भीतीनं मी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. दुर्गंधी येऊ नये म्हणून तिचं मांस कुकरमध्ये शिजवलं, असं साने म्हणाला होता. मात्र, आता तो खून मीच केल्याचं म्हणत आहे.सरस्वती माझ्याशी प्रामाणिक नव्हती. त्यामुळं आमच्यात भांडणं होतं. त्यातूनच मी तिला चाकून भोसकून ठार केलं. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इलेक्ट्रिक कटरनं तिचे तुकडे केले, असं साने आता सांगत आहे. त्याचवेळी, ती मला मामा म्हणायची. मी एचआयव्ही बाधित असल्यानं आमचा शरीरसंबंध कधी आलाच नाही, असंही त्यानं पोलिसांना सांगितलं. ‘मी जे काही केलं त्याची मला खंत नाही. सरस्वतीला मारल्यानंतर मी स्वत:लाही संपवणार होतो, असंही त्यानं चौकशीत सांगितलं.
पोलिसांनी सरस्वती वैद्यच्या मृतदेहाचे जप्त केलेले तुकडे जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. हा अहवाल आल्यानंतर तिच्या मृत्यूचं नेमकं कारण व वेळ समोर येऊ शकेल, असं मिरा-भाईंदरचे पोलीस उपायुक्त जयंत बाजबळे यांनी सांगितलं.