• Mon. Aug 18th, 2025

शरद पवारांनी ठणकावलं.. ‘धमकीने माझा आवाज बंद होईल हा तुमचा गैरसमज’

Byjantaadmin

Jun 9, 2023

धमकी देऊन माझा आवाज बंद होईल असं कुणाला वाटत असेल तर गैरसमज आहे. धमकीला आपण भीक घालत नसल्याचं शरद पवार यांनी आज स्पष्ट केलं आहे.

‘धमकी देऊन माझा आवाज बंद होईल असं कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था सांभाळणारी जी यंत्रणा आहे, त्यांच्या कर्तृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केली. शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पवारांना धमकी आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीर शरद पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, शरद पवार यांना धमकी देणाऱ्या तरुणाविरुद्ध मुंबईतील एल टी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.पवार पुढे म्हणाले, ‘ज्यांच्या हातात राज्याची सूत्र आहेत त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही.’ असं सांगत धमकीला आपण भीक घालत नसल्याचं शरद पवार यांनी आज स्पष्ट केलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, शरद पवार यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एक तास सविस्तर चर्चा केली होती. त्यानंतर एलटी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवारांची सुरक्षा वाढविण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना

शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकीच्या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. शरद पवार यांच्या कन्या,बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे. तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.’

शरद पवारांना धमकी देणारी पिलावळ मनुवादी; भुजबळ संतापले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या असून त्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. राजकीय नेत्यांना धमकी येणं ही काळजीची बाब आहे. कारण यापूर्वी नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांसारख्या विचारवंत आणि कार्यकर्त्यांचे खून झाले आहेत. त्यामुळं राज्य आणि केंद्र सरकारनं यामागचे ब्रेन कोण आहेत हे शोधून काढावेत, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *