राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर राज्यभर एकच खळबळ उडाली. “तुमचा दाभोळकर होणार,” असं ट्वीट करत ही धमकी देण्यात आली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत याबाबत तक्रार दाखल केली. त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा नेत्यांवर संशय व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, शरद पवार साहेबांची खूप मोठी राजकीय कारकीर्द आहे. इतक्या वर्षांमध्ये त्यांना अशा धमक्या येणं हा काही त्यांच्यासाठी नवीन प्रकार नाही. ते इतकी वर्ष राजकारणात आहेत, अशा धमक्यांना ते भिक घालत नाहीत, आणि मुळीच घाबरत नाहीत.आमदार मिटकरी म्हणाले, माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना (देवेंद्र फडणवीस) विनंती आहे की, तुमच्या पक्षाच्या (भाजपा) लोकांनी गुणरत्न सदावर्तेकरवी काही दिवसांपूर्वी सिल्व्हर ओकवर (शरद पवारांचं निवासस्थान) हल्लाबोल केला. परवा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पवार साहेबांचा एकेरी उल्लेख केला. गोपीचंद पडळकर काहीतरी बोलत राहतो. काल तो निलेश राणे बोलला. देवेंद्र फडणवीसांना आमचं सांगणं आहे की, तुमच्या पक्षातील विषारी विचारसरणी असलेले हे लोक सातत्याने खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत. माझी विनंती आहे की, हे सगळे फेसबुक पेज, ट्विटर अकाऊंट्स, व्हॉट्सअॅप अकाऊंट्सचे मास्टरमाईंड हे लोक आहेत का ते तपासलं पाहिजे. मला पूर्ण खात्री आहे की, गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी ज्यांनी पवार साहेबांवर तोंडसुख घेतलं होतं ही तीच पिलावळ आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, यांनी कितीही धमक्या दिल्या तरी ncp या थर्ड क्लास लोकांच्या धमक्यांना घाबरणार नाही. तसेच bjp असं राजकारण करून निवडणूक लढू शकणार नाही, जिंकू शकणार नाही.