• Sun. May 11th, 2025

“मी उपस्थित केलेली शंका खरी ठरली, पीडित तरुणीला…”, मुंबईतील बलात्कार-हत्या प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Byjantaadmin

Jun 8, 2023

मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात सावित्रीबाई फुले वसतिगृहात १८ वर्षीय तरुणीची हत्या झाल्याची घटना समोर आली. गंभीर म्हणजे पीडित तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला आहे. त्यामुळे पीडित तरुणीवर बलात्कार झाल्याचाही संशय आहे. वसतिगृहातील सुरक्षा रक्षकानेच पीडितेवर बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपीने या कृत्यानंतर चर्नी रोड स्थानकाजवळ रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. या संतप्त घटनेप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मरीन लाईन पोलीस स्टेशनला जाऊन माहिती घेतली. तसेच पीडितेच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. यानंतर अजित पवारांनी माध्यमांना माहिती दिली.

Ajit Pawar on Mumbai Rape Murder Case

अजित पवार म्हणाले, “मुंबईतील चर्चगेट भागात सावित्रीबाई फुले वसतिगृहात त्या तरुणीबाबत दुर्दैवी घटना घडली. यानंतर तिचे आई-वडील, भाऊ गावाहून मुंबईत आले. या आई-वडिलांना जुळा मुलगा-मुलगी झाले होते. दोघेही दहावीपर्यंत अभ्यासात हुशार म्हणून ओळखले जात होते. दहावीनंतर मुलाने पुण्यात आयटीआय करण्यासाठी प्रवेश घेतला. मुलगी मुंबईत शिक्षणासाठी आली होती.”

“मी उपस्थित केलेली शंका खरी ठरली”

“मी दुपारी जी शंका उपस्थित केली होती ती खरी ठरली. सावित्रीबाई फुले वसतिगृहात ४५० मुलींची व्यवस्था आहे. असं असताना तिथं केवळ १० टक्के मुलीच तिथं राहतात. विशेष म्हणजे पीडित तरुणी एकटीच चौथ्या मजल्यावरील एका रुममध्ये राहत होती. एवढं मोठं वसतिगृह असल्याने सर्व मुलींना एकाच मजल्यावर ठेवता आलं असतं. तसं का केलं नाही?” असा सवाल अजित पवारांनी विचारला.

“पहाटे चार-पाच वाजल्याच्या दरम्यान दुष्कृत्य करणारा व्यक्ती…”

अजित पवार पुढे म्हणाले, “याबाबत पोलिसांनी वसतिगृहाच्या रेक्टरांना विविध प्रश्न विचारले आहेत. सीसीटीव्हीत कोण बाहेर पडलं हेही तपासण्यात आलं. पहाटे चार-पाच वाजल्याच्या दरम्यान ज्याने दुष्कृत्य केलं तो व्यक्ती वसतिगृहातून बाहेर पडला. तसेच रेल्वे रुळावर जाऊन त्यांने आत्महत्या केली. त्यामुळे तोही पुरावा राहिलेला नाही. त्यामुळे यात आणखी काही शक्यता आहेत का हेही तपासलं जात आहे.”

“आरोपीला सरकारने वसतिगृहात नेमलं नव्हतं, तरी तो…”

“मी आणि अमोल मिटकर दोघांनी पोलिसांना सांगितलं आहे की, पीडिता आणि आरोपी दोघांचे फोन पोलिसांकडे आहेत. त्यामुळे पोलिसांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते कोणाशी बोलत होते, काय बोलले, किती वेळ बोलले हे तपासावं. कारण आरोपीला या वसतिगृहात सरकारने नेमलेलं नव्हतं, तरी तो वसतिगृहात राहत होता,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *