• Mon. May 12th, 2025

Video : सोशल मीडिया अकाऊंट्स डिलिट, ४०० जणांवर गुन्हे, ३६ जण अटकेत; कोल्हापूर दंगलीप्रकरणी पोलीस म्हणाले…

Byjantaadmin

Jun 8, 2023

कोल्हापुरात गेले दोन दिवस अशांतता आहे. काही मुलांनी व्हॉट्सअॅप स्टेटसवर ओरंगजेबाचे फोटो ठेवल्याप्रकरणी हा राडा सुरू झाला. मंगळवारी कोल्हापुरात दंगल उसळल्यानंतर बुधवारी कोल्हापूर बंद पाळण्यात आला. आताही कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ३६ जणांना अटक केली असून यामध्ये तिघेजण अल्पवयीन आहेत. त्यांना आज बालन्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

ते म्हणाले की, “स्टेटस ठेवणारे हे कॉलेजचे विद्यार्थी आहेत. ते कोणाशी संबंधित आहेत का? त्यांना कोणी चिथावणी दिली होती का? यासंबंधीचा तपास सुरू आहे. औरंगजेबाचे फोटो व्हॉट्सअॅपला ठेवणाऱ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मोबाईल जप्त केल्यानंतर मोबाईल तपासणी करताना त्यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट्स डिलिट केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांचा डेटा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसंच, त्यांनी स्टेटसला ठेवलेले व्हिडिओ आणि फोटो त्यांना कुठून मिळाले होते, याचीही तपासणी सुरू आहे”, असं पोलीस म्हणाले.

“कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील परिस्थिती काल दुपारपासून पूर्ववत झाली आहे. ४ एसपीआरएफच्या तुकड्या, ३०० पोलीस कॉन्स्टेबल, ६० पोलीस अधिकारीही तैनात करण्यात आले आहेत”, अशीही माहिती त्यांनी दिली. “कोल्हापुरात औरंगजेबाचे व्हॉटसअॅपला स्टेटस ठेवले असल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर पोलीस खातं तत्काळ सक्रिय झालं होतं. मंगळवारपासूनच संपूर्ण जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही गावं बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं”, अशीा माहिती पोलिसांनी दिली.

या राड्यानंतर तीन पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. ३०० ते ४०० आरोपींवर हे गुन्हा दाखल असून ३६ जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी तिघेजण अल्पवयीन असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, कोल्हापुरातील शांतता भंग करण्याकरता बाहेरून कोणी आले होते का असाही प्रश्न पत्रकारांनी यावेळी विचारला. तेव्हा पोलीस म्हणाले की, “सीसीटीव्ही फुटेजवरून आम्ही पुढील चौकशी करत आहोत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यासंबंधित अधिक चौकशी केली जाणार आहे. त्यानंतरच याप्रकरणात कोणी बाहेरून आले होते का हे समजू शकेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *