त्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या घटनेनंतर कोल्हापुरात मोठा हिंसाचार झाल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील मुख्य चौकात दोन गटात राडा झाल्यानंतर आज हिंदुत्ववादी संघटनांनी आज घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारला आहे. याशिवाय कोल्हापूर पोलिसांनी येत्या १९ जून पर्यंत शहर परिसरात जमावबंदी लागू केली आहे. त्यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्लिम संघटनांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुस्लिम संघटनांनी याबाबत कोल्हापूर पोलिसांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. याशिवाय मुस्लिम संघटनांनी कोल्हापुरकरांना शांततेचं आवाहन केलं आहे.
मुस्लिम संघटनांनी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना आदर्श मानून कोल्हापुरातील मुस्लिम समाज जगत आहे. राजर्षी शाहू महाराज यांचं शहर असलेल्या कोल्हापुरात काही समाजकंटकांनी शिवरायांवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. शहराचं सामाजिक सौंहर्द आणि शांतता बिघडवणाऱ्यांना पाठिंशी घातलं जाणार नाही, पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करत त्यांना ठेचून काढावं अशी मागणी मुस्लिम संघटनांनी पत्राद्वारे केली आहे. समाजकंटांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापुरकरांनी शांतता, एकोपा आणि बंधुभाव बिघडू देऊ नये, असं म्हणत मुस्लिम संघटनांनी शांततेचं आवाहन केलं आहे.
शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी समाजकंटकांनी वादग्रस्त पोस्ट शेयर केल्यानंतर त्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर शहरातील मुख्य चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन करत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थिती नियंत्रणात आणली. याशिवाय शहरातील अनेक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच येत्या १९ जून पर्यंत पोलिसांनी शहरात प्रवेशबंदी लागू केली आहे.