शिवराज्याभिषेक दिनादिवशी आक्षेपार्ह व्हॉटसप स्टेटस लावल्याप्रकरणी कोल्हापुरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी यामध्ये आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही तरुणांनी लावलेल्या स्टेटसमुळे कोल्हापुरच्या एकतेला तडा गेल्याचं वातावरण निर्माण झालं आहे. हिंदू मुस्लिम एकतेचा आदर्श घालून देण्यासाठी अथक प्रयत्न केलेल्या शाहू महाराजांनी कोल्हापुरातलं हे वातावरण अस्वस्थ करणारं आहे.शाहू महाराजांनी केलेली कामं, त्यांनी केलेले प्रयत्न याविषयी आपण जाणून घ्या. इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या राजर्षी शाहू छत्रपती महाराज या पुस्तकामध्ये या कामांचा उल्लेख करण्यात आला आहे.
मुस्लीम वसतिगृहाची स्थापना
त्या काळात मुस्लीम समाजातली अगदी बोटावर मोजण्याइतपत मुलं शाळेला जायची. त्या मुलांची सोय शाहू महाराजांनी मराठा वसतिगृहात केली होती. पण त्यांना मुस्लीम समाजासाठीही स्वतंत्र वसतिगृह उभारायचं होतं. त्यांनी काही प्रतिष्ठित मुस्लीम नागरिकांची बैठक घेतली, त्यांच्यासमोर ही संकल्पना मांडली.मुस्लीम नागरिकांनी यासाठी काही करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा महाराजांनी त्यांना किमान ३००० रुपये जमा करण्यास सांगितलं, उरलेले पैसे स्वतःच्या दरबाराच्या वतीने देण्याची ग्वाही दिली. उपस्थितांनी ४,००० रुपये जमा केले, शाहू महाराजांनी तेवढेच पैसे देण्याचं आश्वासन दिलं.
मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना
या बैठकीनंतर मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. शाहू महाराज या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष झाले. शाहू महाराजांचे गुरु सर फ्रेझर यांनी १९२० मध्ये कोल्हापूरला भेट दिली, तेव्हा त्यांच्याच हस्ते मुस्लीम बोर्डिंगच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली. शाहू महाराजांनी साडेपाच हजार रुपयांचे रोख देणगी देत २५ हजार चौरस फूट मोकळी जागाही दिली.
कुराण ग्रंथ मराठीत आणला
मुस्लीम समाजातील नागरिकांनी त्यांचा कुराण हा धर्मग्रंथ अरबीत असल्याने वाचता येत नसल्याचं बोलून दाखवलं. त्यानंतर शाहू महाराजांनी स्वतः २५,००० रुपयांची देणगी दिली आणि कुराण ग्रंथ मराठीत आणला.