• Sun. Aug 17th, 2025

फुले- शाहु – आंबेडकर  विचार स्तंभाचे निलंग्यात  भूमिपूजन

Byjantaadmin

Aug 17, 2025

फुले- शाहु – आंबेडकर  विचार स्तंभाचे निलंग्यात  भूमिपूजन..

निलंगा

फुले, शाहु ,आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी मनुवादी सरकारच्या  विरोधात रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना मौजे रामलिंग मुदगड ता.निलंगा जिल्हा लातूर येथील कायद्याचे शिक्षण घेत असलेला तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांना परभणी येथील जातीयवादी पोलिसांकडून  अमानुष मारहाण करण्यात आली. या  झालेल्या मारहाणीत  सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू  झाला. मात्र परभणी पोलिसांकडून  सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू  इतर आजारानं झाला असल्याची वल्गना  करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तशीच वल्गना  सभागृहात केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी  परभणी पासुन ते दिल्ली पर्यंत स्वतः पुढाकार घेऊन सत्य समोर आणून एका वडार समाजाला न्याय देण्यासाठी झटले त्यावेळी निलंगा येथील रणरागिणी विजयाताई सूर्यवंशी यांना अनेक अमिषे दाखवून न्याय मिळू नये म्हणून जिवाचे रानही जातीयवाद्यांनी केले. 

मात्र  स्वाभिमानी बाणा असलेल्या  विजयाताई सूर्यवंशी कोणत्याही आमिषाला बळी पडल्या नाहीत म्हणुन सोमनाथ सूर्यवंशी याला शहीद दर्जा मिळवून देण्यास  श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे.असे अनेक तरुण संविधान सन्मानासाठी आणि फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचारासाठी शहीद झाले.अशा तरुणाच्या स्मृती कायम राहण्यासाठी निलंगा येथील  वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयात फुले,शाहु, आंबेडकर विचार स्तंभाचे विजयाताई सूर्यवंशी यांच्या हस्ते  भूमिपूजन करण्यात आले.यावेळी मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यामध्ये  अनेक बहुजन समाजाच्या स्वातंत्र्य सैनिकांना सन्मान मिळाला नाही अशा  दुर्लक्षित झालेल्या सैनिकांचा त्याग कायम स्मरणात कायम राहण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने व निंबाळकर परिवाराच्या वतीने स्वातंत्र्य सेनानी गणपतराव निंबाळकर यांच्या पुतळ्याचेही अनावरण करण्यात आले.या प्रसंगी निलंगा शहरात विजयाताई सूर्यवंशी यांची विजयी रॅली काढण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या मध्यवर्ती कार्यालयात सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचे दोन्ही भाऊ वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा  सौ. मंजू  निंबाळकर, डॉ हिरालाल निंबाळकर, वडार समाजाचे अध्यक्ष शामराव दंडगुले, मुस्लिम समाजाचे नेते  वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *