लातुरात नर्सिंगच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना
लातूर : लातूर येथे एका नर्सिंगच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या विर्थ्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही विद्यार्थिनी परभणीची असून ती लातूरमध्ये शिक्षण घेत होती. जी.एन.एम हा द्वितीय वर्षातील तिसरा पेपर अवघड गेल्यानं एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शहराच्या एलआयसी कॉलनीमधील बलदवा नगर येथील एका अपार्टमेंटमध्ये काल गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
वैशाली अविनाश राठोड (वय २० रा, देवतांडा, ता. परभणी, जि. परभणी, ह. मु. एलआयसी कॉलनी, लातूर) असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. मयत वैशाली राठोड ही आई वडील दोन भाऊ यांच्यासोबत लातूर येथील एलआयसी कॉलनीत बलदवा नगरमध्ये एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होती. हे कुटुंब मुलांच्या शिक्षणासाठी लातूर येथे राहत होते. वैशाली ही येथील एका महाविद्यालयात जी.एन.एमच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती आणि द्वितीय वर्षाच्या वार्षिक परीक्षा आता सुरू आहेत.
बुधवारी दि.१३ ऑगस्ट रोजी झालेला नर्सिंगचा तिसरा पेपर वैशाली हिला अवघड गेल्याचं तिने तिच्या मैत्रिणींकडे बोलताना सांगितलं होतं. पेपर संपल्यानंतर बुधवारी दुपारी ती घरी गेली. मध्यरात्रीच्या सुमारास तिने घरीच छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तिच्या कुटुंबीयांना गुरुवारी सकाळी समजली. त्यांनी खासगी रुग्णालयात नेलं. परंतु, तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
लातूर शहरात राज्यभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. यामध्ये ११वी-१२वी यासह उच्च शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी शेजारच्या जिल्ह्यातूनही लातूरमध्ये येतात. अलीकडच्या काळात लातूर शहरात होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. याचे प्रमुख कारण अद्याप तरी लक्षात आलेलं नाही.
