राजे दत्ताजीराव जाधवराव यांच्या समाधीचे सुशोभीकरण करण्यासाठी मराठा सेवा संघाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांना साकडे…
ऐतिहासिक वास्तू जतन करण्याची मागणी…
निलंगा प्रतिनिधी/-राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचे भाचे स्मृतिशेष राजे दत्ताजीराव जाधवराव यांचे शहरालगत समाधीस्थळ आहे.या समाधीस्थळाच्या सुशोभीकरनासाठी निधी उपलब्ध करून देऊन विकास करावा,अशी मागणी मराठा सेवा संघाच्या वतीने माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे करण्यात आली आहे.राजे दत्ताजीराव जाधवराव यांची समाधी काही वर्षापुर्वी शोधून काढण्यात आली.
सिंदखेडकर जाधवराव घराण्याचे संस्थापक राजे लखुजीराव जाधवराव यांचे नातू व राजमाता जिजाऊ यांचे भाचे राजे दत्ताजीराव जाधवराव हे १० नोव्हेंबर १६६५ रोजी विजापूरकर आदिलशाहाविरुद्ध झालेल्या कलबुर्ग(गुलबर्गा) युद्धात मोगलांच्या बाजूने लढताना आपले दोन पुत्र राघोजी व यशवंतराव यांच्यासह मारले गेले होते.त्यांचे अंत्यसंस्कार लष्करी तळ असलेले निलंगा येथे करण्यात आले होते.यावेळी दत्ताजीराव यांच्या पत्नी सौ. सगुणाबाईसाहेब या सती गेल्या होत्या.या सर्वांच्या समाध्या निलंगा येथे बांधण्यात आल्या होत्या, परंतु काही कारणामुळे या समाध्या आजपर्यंत दुर्लक्षित होत्या.तेव्हा कासारशिरशी रोडवरील अशोकनगर लगत स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना असलेल्या समाध्या राजे दत्ताजीराव व त्याच्या वारसांच्या असल्याचे काही वर्षांपूर्वी सिद्ध झाले आहे.
त्याठिकाणी दरवर्षी त्यांचे वंशज डॉ. नरेश जाधवराव व मराठा सेवा संघाच्या वतीने जयंती, स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.ही ऐतिहासिक वास्तू जतन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यामुळे शुक्रवारी दि.१५ रोजी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची भेट घेऊन त्यांना ऐतिहासिक समाधी वास्तू बद्दल माहिती देऊन संवर्धन व सुशोभीकरण करण्यात यावे यासाठी मराठा सेवा संघाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन माहिती दिली.तेव्हा त्यांनी संबंधित विभागास माहिती देऊन निधी उपलब्ध करून देऊ आणि त्या ऐतिहासिक समाधीस्थळाचे संवर्धन आणि सुशोभीकरण करू असे सांगितले. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा संघटक विनोद सोनवणे, भाजपा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे ,जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे बालाजी जाधव उजेडकर , जोतिरादित्य जाधव आदी उपस्थित होते.
