णे : काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचा डेटा दाखवत मतांची चोरी झाल्याचा दावा केला आहे. या आरोपानंतर विरोधक आक्रमक होत रस्त्यावर उतरले असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या राजकीय घडामोडींमध्ये आता समाजसेवक अण्णा हजारे यांनाही लक्ष्य करणारे फ्लेक्स पुण्यातील पाषाण परिसरात झळकले आहेत. अण्णा आता तरी उठा….कुंभकर्णसुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता… तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा….. होय मतांची चोरी आहे, अशा आशयाचे हे फ्लेक्स होते. या अनोख्या फ्लेक्सबाजीमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. त्यावरती अण्णांनी नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.

मी करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं ही अपेक्षा चुकीची
मी दहा कायदे आणले, मात्र 90 वर्षानंतर देखील मी करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं ही अपेक्षा चुकीची आहे. अण्णांनी जे केलं ते आपण करावं असं तरुण युवकांना वाटलं पाहिजे, देशाचे नागरिक आहेत तर आपलं काही कर्तव्य आहे की नाही. काल स्वतंत्र दिवस साजरा केला, नुसता तिरंगा हातात घेऊन होणार नाही, बोट दाखवून काहीही होणार नाही. मी मोठ्या आशेने तरुणाकडे पाहतोय, युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती आहे, ही जागी झाली तर उद्याच भविष्य दूर नाही. मात्र एवढे वर्ष लढून कायदे करून जेव्हा कानावर येतं अण्णांनी जाग झालं पाहिजे तेव्हा वाईट वाटतं, अण्णा हजारेंनी पुण्यात लावलेल्या फ्लेक्सबोर्ड वर नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.
त्या फ्लेक्सवरील मजकूर काय आहे?
देशात मतांची चोरी होत असताना,
देशात भ्रष्टाचार फोफावला असताना,
देशात हुकूमशाही माजलेली असताना,
देशाची लोकशाही धोक्यात असताना.
अण्णा तुमच्या सारखा जेष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
अण्णा, दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर पुन्हा तुमची जादू पाहण्यासाठी देश आतुर आहे. अशा आशयाचे बॅनर पुण्याच्या पाषाण परिसरात लावण्यात आले आहेत. पाषाण भागातील सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांनी हे बॅनर्स आपल्या नावासह लावले असून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर, मतचोरीवर अण्णांनी बोलावे, आंदोलन करावे, अशी मागणी या बॅनरमधून करण्यात आलीय.
राहुल गांधींकडून मतचोरीचा आरोप
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतांची चोरी झाल्याचा दावा करत, निवडणूक आयोग आणि भाजप सरकारवर हल्लाबोल केला. मतदार याद्यांमधील घोळ, बोगस मतदान, ईव्हीएमचा घोळ सांगत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले आहेत. त्यावरुन, सध्या देशभरात विरोधक आक्रमक झाले आहेत. तर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही निवडणुकांपूर्वी 2 व्यक्ती भेटल्याचा संदर्भ देत संभ्रम निर्माण केला. त्यामुळेच, पुण्यात अण्णा हजारेंनी आता तरी सरकारला सवाल करावे, अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत.