कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर काल दुपारपासून कोल्हापूरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत. त्यांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकवटले आहेत. पोलिसांनी संबंधितांविरोधात कडक कारवाई करावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.
अशातच गृहमंत्रालयाने कोल्हापुरात शांतता प्रस्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. तर कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेत दोषी असणाऱ्या काल दगडफेक करणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या 6 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्याची माहिती केसरकर यांनी सांगितलं आहे.तर दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले आहेत. तर कोल्हापुरातील परिस्थिति नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
समाज माध्यमावर वादग्रस्त स्टेटस् ठेवल्यामुळं कोल्हापूर शहरात दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला, त्यामुळं हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आज (बुधवार, ता. 7) कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. औरंगजेबाच्या समर्थनाचा स्टेटस ठेवल्याच्या प्रकरणावरून लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर जमावानं सुमारे तीन तासांहून अधिक काळ घोषणाबाजी केली.‘जय श्रीराम’चा नारा देत या घटनेतील संशयितावर कडक कारवाई करावी, यासाठी आंदोलन केलं. संतप्त जमावातील काही तरुणांनी या परिसरातील दुकाने बंद पाडली.
बघता-बघता बिंदू चौक ते दसरा चौक, बिंदू चौक ते शिवाजी रोड, लुगडीओळ, कोंडाओळ, अकबर मोहल्ला तसेच सीपीआर चौक परिसरात तणाव निर्माण झाला. जमावाने लक्ष्मीपुरी बाजार येथे हातगाड्या उलटविल्या, काही दुकानांवर दगडफेक झाली. जमाव दुकाने बंद करत या परिसरातून फिरत होता. त्यामुळं काही काळ दुकाने बंद राहिली.दुपारपासून लक्ष्मीपुरीत तणाव वाढत होता. चिमासाहेब चौकातील काही हातगाड्यांवरील साहित्य संतप्त जमावाने फेकून दिले. टाऊन हॉलमागील एका चिकन सेंटरची तोडफोड केली. संतप्त जमावाला रोखण्याचा प्रयत्न पोलिस करत होते. परंतु, जमाव तोडफोड करत सुटला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून शहरातील सर्व पोलिस फौजफाटा या परिसरात तैनात करण्यात आला.
तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणा
औरंगजेबाची स्तुती करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाही. असे सांगत, जनतेला शांतता पाळण्याचं आवाहन फडणवीस यांनी केल आहे. तसेच, कोल्हापूर पोलिसांना दोषींवर कठोर कारवाई करा अशी सूचनादेखील दिली आहे. कुणी चुकीचं वागत असेल तर त्याच्यावर कारवाई करा. ताक्ताळ परिस्थिती नियंत्रणात आणा. असे निर्देश गृहविभागाने दिले आहेत.यासोबत खबरदारी म्हणून इतर जिल्ह्यांवरही बारीक नजर ठेवा अशी सूचनाही पोलिसांना देण्यात आली आहे