एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यांवरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे.
MUMBAI: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्ली दौरा केला. मागील वर्षभरात दोघेही अनेकदा दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यावरून ते टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत. संजय राऊत यांच्यानंतर आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ते पत्रकारांशी बोलत होते. ‘एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या इशाऱ्यावरच काम करतात. दिल्लीकरांनी सांगितल्याशिवाय हे एकही निर्णय घेऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीचे हस्तक असून त्यांचा एक पाय कायम दिल्लीतच असतो, अशी बोचरी टीका पटोले यांनी केली आहे’मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःच औरंगाबादच्या सभेत मोदी-शहांचे हस्तक आहोत असं जाहीरपणे सांगितलंय. आता ते दिल्लीत मंत्रिमंडळ विस्तारासाठी गेलेत अशी चर्चा आहे कारण दिल्लीला विचारल्याशिवाय यांचं पानही हलू शकत, राज्यकारभार करणं तर दूरची गोष्ट आहे. वर्षभरापासून अनेक विभागांना मंत्री नाहीत, एका-एका मंत्र्यांकडं सहा-सात खात्यांचा कारभार आहे तर सहा-सहा जिल्ह्यांना एकच पालकमंत्री आहे, यामुळं राज्यातील प्रशासन ठप्प झालं आहे. मंत्री कोणत्याच विभागाला न्याय देऊ शकत नाहीत. प्रशासन ठप्प असून कामकाज होत नाही त्यामुळं जनता त्रस्त आहे. लोकांची कामं होत नाहीत पण शिंदे-फडणवीस सरकारला त्याची चिंता नाही, असं पटोले म्हणाले.
राज्यात आज अनेक भागात पाण्याची तीव्र टंचाई आहे, शेतकरी हवालदिल आहे, अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शेतमाल रस्त्यावर टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. पण शिंदे सरकारला त्याचे काहीही देणेघेणे नाही. मोठ-मोठ्या घोषणा करायच्या आणि केवळ इव्हेंटबाजी करून जनतेच्या पैशाची लूट करण्याचं काम सुरू आहे, असा आरोप पटोले यांनी केला.