कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे. यावेळी कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच दिल्ली पोलिसांच्या वर्तनावरही महिला कुस्तीपटूंनी गृहमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचं समजतं. त्यानंतर आता कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतल्याचा दावा भाजपाशी संबंधित लोकांनी केला होता. परंतु आता यावर आंदोलक कुस्तीपटू साक्षी मलिकने स्पष्टीकरण देत आंदोलन सुरुच राहणार असल्याचं म्हटलं आहे.
आंदोलक कुस्तीपटूंनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याचा दावा भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा वैशाली पोतदार यांनी केला होता. त्यानंतर अनेक माध्यमांत आंदोलन मागे घेण्यात आल्याचं वृत्त चालवण्यात आलं. तसेच आंदोलन संपवल्यानंतर साक्षी मलिक पुन्हा रेल्वेच्या कामावर रुजू होणार असल्याचाही दावा काही भाजपाशी संबंधित लोकांनी केला होता. परंतु आता साक्षी मलिकने या सर्व बातम्या आणि दाव्यांचं खंडन केलं आहे. न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच राहणार असून आम्ही मागे हटणार नसल्याचं साक्षी मलिकने ट्वीट करत म्हटलं आहे. त्यामुळं आता भाजपाचे पदाधिकारी आणि आंदोलक कुस्तीपटू यांच्यात शाब्दिक वॉर रंगण्याची शक्यता आहे.
वैशाली पोतदार यांनी माहिती दिल्यानंतर अनेक माध्यमांनी आंदोलन मागे घेण्यात आल्याचं वृत्त चालवलं, त्याला प्रत्युत्तर देत आंदोलक कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली की, माध्यमांनी पसरवलेलं वृत्त खोटं आहे. पीडितांना न्याय मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. बृजभूषण यांच्याविरोधात आंदोलन करत असताना मी रेल्वेतील नोकरीही करत आहे. तुम्हाला विनंती आहे की, आमच्या आंदोलनाबाबत चुकीच्या बातम्या पसरवू नका, असं म्हणत साक्षी मलिकने वैशाली पोतदार यांच्या दाव्याचं खंडन करत स्पष्ट आणि थेट भूमिका मांडली आहे.